नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 08:12 IST2026-04-29T08:11:59+5:302026-04-29T08:12:35+5:30
दिल्लीच्या कंपनीची चौकशी, नेदरलँडवरून दिल्ली विमानतळावर इतक्या मोठ्या प्रमाणातील ड्रग्जचे पार्सल कसे सहजपणे क्लिअर झाले? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे

नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
मनीषा म्हात्रे
मुंबई - टिटवाळ्यात सापडलेल्या पार्टी ड्रग्जचे नेदरलँड कनेक्शन समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेत कार्यरत एका नायजेरियन आरोपीने ड्रग्ज सप्लायर आमिर सय्यदयाला तब्बल २५ हजार एक्स्टसी (एमडीएमए) गोळ्यांचे पार्सल नेदरलँडवरून भारतात पाठवले. विशेष म्हणजे, हे पार्सल कोणत्याही अडथळ्याविना दिल्ली विमानतळावर कस्टम क्लिअरन्स होऊन पुढे कुरियरमार्फत उल्हासनगरमध्ये पोहोचले. त्यानुसार, नायजेरियन आरोपीसह त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घाटकोपर अमली पदार्थ विरोधी विभागाकडून सुरू आहे. तसेच दिल्लीतील कुरियर कंपनीकडेही पथकाकडून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
एएनसीने सय्यदसह इरफान अन्सारी, अश्विनी पॉल, सुफियान शेखला अटक केली आहे. अमीरने दिलेल्या माहितीनुसार, नायजेरिन आरोपीने गेल्या वर्षी २५ ऑगस्टला नेदरलँडहून २५००० एक्स्टसी गोळ्यांचे पार्सल कुरियरने पाठविले. हे पार्सल त्याने उल्हासनगरच्या श्री तिरुपती कुरीयर सर्विस प्रा. लि. कडून २६ ऑगस्ट रोजी स्वीकारले. या गोळ्या त्याच्या नायजेरीयन साथीदाराने सांगितल्यानुसार पनवेल, वाशी, खारघरमध्ये सय्यदने पुरवल्या. काही गोळ्या इरफानलाही पुरवल्या. इरफानने त्याला यूपीआयद्वारे त्याचे आगाऊ पैसे ट्रान्सफर केल्याचे पुरावेही मिळाले आहेत. त्यातीलच ५ हजार गोळ्यांचा साठा अश्विनीच्या घरातून जप्त केला. मंगळवारी इरफान, सय्यद व अश्विनीची कोठडी संपत असल्याने न्यायालयात पोलिसांनी सय्यदच्या आठ दिवस वाढीव कोठडीची मागणी केली. मात्र, आरोपीच्या वकिलांनी विरोध केला. दोन्ही वकिलांच्या युक्तिवादानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कस्टम अधिकारीही संशयाच्या घेऱ्यात?
नेदरलँडवरून दिल्ली विमानतळावर इतक्या मोठ्या प्रमाणातील ड्रग्जचे पार्सल कसे सहजपणे क्लिअर झाले? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित कुरीयर कंपनी व त्यामध्ये सहभाग असलेल्या अन्य सहकाऱ्यांच्या चौकशीसाठी एक पथक चार दिवसांपूर्वीच दिल्लीला रवाना झाले आहे. त्यानुसार संबंधित कुरियर कंपनीकडे तपास सुरू आहे. यामध्ये किती जणांचा कसा सहभाग आहे? यात कस्टम अधिकाऱ्याचाही सहभाग आहे का? या सर्व या बाजूने तपास सुरू आहे.
उत्तर प्रदेशमध्येही पुरवठा
उत्तर प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथक तेथे रवाना झाले असून, आणखी साठा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सय्यदने उत्तर प्रदेशमधील साथीदारालाही मोठ्या प्रमाणात गोळ्यांचा साठा पुरवल्याची माहिती हाती लागल्याने पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले आहे.