यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ दमदार कामगिरी करत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या पंजाब किंग्सच्या संघाला काल रात्री झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने पराभवाचा धक्का दिला. मात्र एकीकडे सातत्यपूर्ण खेळ करत असताना मैदानाबाहेरील घडामोडींमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ सातत्याने अडचणीत सापडत आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफमधील एका सदस्याने सामन्यादरम्यान मोबाईलचा वापर केल्याने वाद निर्माण झाला होता. आता राजस्थानचा कर्णधार रियान पराग हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामन्यादरम्यान, रियान पराग याचा ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पंजाब किंग्सविरुद्ध काल रात्री न्यू मुल्लापूर येथे झालेल्या लढतीदरम्यान, रियान पराग हा स्मोकिंग करतानाचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालं आहे.हा प्रकार राजस्थानच्या डावादरम्यान, १६ व्या षटकात घडला होता. दरम्यान, कुणीतही हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रियान पराग याने केलेल्या या कृत्यामुळे आयपीएलमध्ये खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या आचार संहितेमधील खेळाच्या प्रतिष्ठेशी संबंधित नियम २.२ चं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे नियमभंग झाल्याने बीसीसीआय त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. त्यानुसार सामनाधिकारी रियान पराग याला अधिकृत ताकिद देऊ शकतात. तसेच त्याच्या सामन्यातील मानधनात कपात करण्याचा किंवा त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासारखा कठोर निर्णय घेऊ शकतात.
याआधी राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंदर हे सामन्यादरम्यान, डगआऊटमध्ये मोबाईल वापरत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यांच्यासोबत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हासुद्धा डगआऊटमध्ये बसला होता. ही बाब आयपीएलमधील नियमांचं उल्लंघ होती. त्यामुळे भिंदर यांच्यावर दंडात्मक कारावाई करून त्यांना ताकिद देण्यात आली होती.
दरम्यान, मैदानाबाहेरील वादामुळे संघ अडचणीत सापडत असला तरी राजस्थान रॉयल्सने स्पर्धेतील आपली सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवली आहे. तसेच आठ सामन्यांमधून ६ विजय आणि १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.