लहान मुलाची अज्ञातांकडून हत्या; गर्दुल्यांवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 18:57 IST2020-09-18T18:56:06+5:302020-09-18T18:57:07+5:30

घरालगतच गोणीत आढळला मृतदेह ; गर्दुल्यांवर संशय 

Murder of a child by unknown in Ghansoli; Suspicion of gangs | लहान मुलाची अज्ञातांकडून हत्या; गर्दुल्यांवर संशय

लहान मुलाची अज्ञातांकडून हत्या; गर्दुल्यांवर संशय

नवी मुंबई : चार वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना घणसोली येथे घडली आहे. सदर मुलगा खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरु होता. यावेळी घरालगतच गोणीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमागे त्याच ठिकाणी दिवस रात्र वावर असलेल्या गर्दुल्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. 

ओमकार शंकर साठे (०४) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो घणसोली गाव येथील बाळाराम वाडी मध्ये राहायला होता. त्याचे वडील रंगकाम कामगार असून त्यांना ओमकार पेक्षा मोठ्या दोन मुली आहेत. शुक्रवारी शंकर हे कामावर गेले असता त्यांची पत्नी व मुले घरी होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ओमकार हा घराबाहेर खेळत होता. या दरम्यान तो एकदा घरी देखील येऊन गेला. परंतु त्यानंतर तो पुन्हा घरी न आल्याने आईने शोधाशोध केली असता, अर्धवट पायऱ्यांवर त्याच्या चिखलाने भरलेल्या पायाचे ठसे दिसून आले. यावरून त्याला पायऱ्यांवरून उचलून नेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र ओमकार अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी शोधाशोध केली. अखेर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावरच एक गोणी पडलेली असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ती उघडली असता त्यामध्ये ओमकार आढळून आला. नागरिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ज्याठिकाणी हि घटना घडली त्या परिसरात दिवस रात्र गर्दुल्यांचा वावर असतो अशी स्थानिकांची तक्रार आहे. याबाबत काहींनी यापूर्वी तक्रारी देखील केल्या आहेत. तर ओमकारच्या हत्येमागे देखील गर्दुल्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा उलगडा करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ओमकारच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यानुसार शवविच्छेदनासाठी मृतदेह पालिका रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी रबाळे पोलिसठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Murder of a child by unknown in Ghansoli; Suspicion of gangs

टॅग्स :Murderखून