लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 11:24 IST2026-05-05T11:24:06+5:302026-05-05T11:24:43+5:30
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला अवघे चार दिवस शिल्लक असताना एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला अवघे चार दिवस शिल्लक असताना एका पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतनपुरा गावात ही घटना घडली आहे. लक्ष्मी कुमारी असं मृत महिलेचं नाव आहे. तिचा पती शुभम राजने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
लक्ष्मीचा भाऊ दीपक कुमार याने सांगितलं की, त्याच्या बहिणीचं लग्न गेल्या वर्षी ८ मे रोजी झालं होतं. येत्या चार दिवसात तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. दीपकच्या आरोपानुसार, शुभम राज याचे शेजारच्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. अनेक वेळा पंचायतीच्या माध्यमातून तडजोड करण्याचा प्रयत्नही झाला, मात्र परिस्थितीत सुधारणा झाली नाही.
पतीच्या प्रेमसंबंधांना सतत विरोध
कुटुंबीनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी तिच्या पतीच्या या प्रेमसंबंधांना सतत विरोध करत होती, ज्यामुळे घरात नेहमी तणाव असायचा. अखेर हा वाद तिच्या जीवावर बेतला. या प्रकरणाची माहिती देताना सदर एसडीपीओ (SDPO) गोपाल मंडल यांनी सांगितले की, रतनपुरा गावात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरुवात केली.
परिसरात एकच खळबळ
पोलिसांनी एफएसएल (FSL) टीमला पाचारण करून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.