भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 11:41 IST2026-05-05T10:59:54+5:302026-05-05T11:41:26+5:30
बंगालचे मुख्यमंत्री बंगालीच असतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. "मी जनतेला खात्री देऊ इच्छितो की पुढील मुख्यमंत्री बंगालमध्येच जन्मलेले, इथेच शिक्षण घेतलेले आणि बंगाली बोलणारे असतील, असेही शाह म्हणाले होते.

भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
पश्चिम बंगालमध्ये बहुमताचा आकडा पार केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लवकरच नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीसाठी कोलकाता येथे पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ९ मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
निवडणुकीपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले होते की, "बंगालचा मुख्यमंत्री हा केवळ 'बंगाली'च असेल." ज्याचा जन्म बंगालमध्ये झाला आहे, ज्याने येथेच शिक्षण घेतले आहे आणि जो अस्खलित बंगाली बोलतो, अशाच व्यक्तीच्या हाती सत्तेची धुरा दिली जाईल. या विधानामुळे 'बाहेरचा मुख्यमंत्री' या तृणमूलच्या प्रचाराला भाजपने पूर्णपणे छेद दिला आहे.
या चार नावांची चर्चा
सध्या, सुभेंदू अधिकारी, शामिक भट्टाचार्य, उत्पल ब्रह्मचरराव आणि स्वप्न दासगुप्ता या चार नावांवर चर्चा सुरू आहे. दिलीप घोष यांच्या नावावरही चर्चा होत आहे.
शुभेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर
शुभेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे, दोन जागांवर निवडणूक लढवून जिंकणारे ते एकमेव भाजप उमेदवार आहेत. दुसरे कारण म्हणजे, त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात सलग दोनदा केलेला पराभव केला.
एका भाजप नेत्याने सांगितले, "अमित शाह शुभेंदू दा यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी त्यांच्यासोबत होते. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात त्यांनीच शुभेंदू दा यांना उमेदवारी दिली होती. पक्ष त्यांची निवड करण्याची शक्यता आहे.