शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष, वकिलाला ४९.५९ लाखांचा गंडा; ४९ लाखांचे झाले होते ९ कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 22:50 IST2026-02-12T22:49:08+5:302026-02-12T22:50:42+5:30
ॲपच्या माध्यमातून केली फसवणूक...

शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष, वकिलाला ४९.५९ लाखांचा गंडा; ४९ लाखांचे झाले होते ९ कोटी!
नागपूर : ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी नागपूरातील एका वकिलाची तब्बल ४९ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केली. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सुबोध हे नियमित शेअर ट्रेडिंग करतात. ८ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्या मोबाईलवर ‘२२-व्हीआयपी सर्व्हिस ग्रुप’ या नावाचे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आली. ग्रुप ॲडमिनने ते सुंदरम एएमसीशी संबंधित असल्याची बतावणी केली व ट्रेडिंगबाबत टीप्स पाठविण्यास सुरुवात केली. प्रोफेसर अरविंद सेठी नावाचा व्यक्ती दररोज सायंकाळी शेअर मार्केटबाबत टीप्स व माहितीदेखील द्यायचा. इन्स्टिट्यूशनल स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली तर दररोज १० ते १५ टक्के परतावा मिळेल असे आमिष आरोपींनी दाखविले.
त्याच्या सांगण्यावरून सुबोध यांनी एक ॲप डाऊनलोड केले व त्यावर नोंदणी केली. ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत वकिलाने ४९ लाख ५९ हजार रुपये गुंतविले. संबंधित ॲपवर नफ्यासह ९ कोटी रुपये झाल्याचे दाखवत होते. वकिलाने दीड कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सेवा शुल्क म्हणून १.३५ कोटी रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे वकिलाच्या लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.