परिमल डोहणे
चंद्रपूर : प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची स्वतःच्या कॉन्स्टेबल मुलीनेच कॉन्स्टेबल प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात तब्बल तीन वर्षांनी उघडकीस आली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह चार जणांना अटक केली आहे.
जयंत अशोकराव बाल्लावार असे मृत पित्याचे नाव आहे. तर प्रियकर कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके (३०, रा. जुना सुमठाणा, भद्रावती), कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार (२२, रा. चंद्रपूर), चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम (२२, रा. नवीन सुमठाणा, भद्रावती) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आर्याचे आशिष शेडमाके याच्याशी २०१२ पासून प्रेमसंबंध होते. या संबंधाला वडिलांचा तीव्र विरोध होता. त्यावरून घरात वारंवार वाद होत असत. या विरोधाचा काटा काढण्यासाठी आर्या आणि आशिष यांनी जयंत बाल्लावार यांना विष देऊन ठार मारण्याचा कट रचला. आशिष शेडमाके याने त्याच्या संघर्षग्रस्त मावसभावाच्या माध्यमातून चैतन्य ऊर्फ मोंटी गेडाम याच्याकडून ५,००० रुपयांत विषाची बाटली विकत घेतली.
मिल्कशेकधून दिले विष
२४ मार्च २०२३ रोजी आशिषने आर्याला विष आणून दिले. २५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आर्याने वडिलांना मिल्कशेकमध्ये विष मिसळून प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर जयंत बाल्लावार कर्तव्यावर गेले असता, त्यांना चक्कर येऊन ते खाली पडले. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी चौघांविरुद्ध कलम ३०२, १२०-बी, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
घरी न येता सासरी गेल्याने संतापला प्रियकर
जयंत बाल्लावार यांच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर आशिष व आर्याने प्रेमविवाह केला. जयंत बाल्लावार हे शासकीय नोकरीवर असल्याने आर्याही अनुकंपा तत्त्वावर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. पासिंग आऊट परेड झाल्यानंतर आर्या ही घरी परत येणार होती. त्यामुळे त्याने घरी स्वागताचे नियोजन केले होते. मात्र ती परेड झाल्यानंतर सासरी जाण्याऐवजी माहेरी गेली. त्यामुळे आशिष रागावला होता.
न्यायाधीशांच्या परवानगीने आरोपींना अटक
आशिष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना त्याची दोन-तीन वादग्रस्त प्रकरणे पुढे आली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केले होते. त्याच्या बडतर्फीमागे आर्याचा हात असल्याचा त्याला संशय होता. त्यातच ती पासिंग आऊट परेड होऊन सासरी न येता माहेरी गेल्याने तो संतापला होता. त्यामुळे त्याने २५ मार्चला पोलिसांत तक्रार केली. रात्री महिला आरोपीला अटक करता येत नसल्याने ठाणेदार आसिफराजा शेख, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे, पीएसआय कृष्णा दरडे यांनी न्यायाधीशांच्या रीतसर परवानगी घेऊन सर्वांना अटक केली.
Web Summary : In Chandrapur, a constable daughter and her constable lover murdered her father for opposing their relationship. They poisoned him. The crime, committed three years ago, has now been solved with four arrests, including a minor.
Web Summary : चंद्रपुर में, एक कांस्टेबल बेटी और उसके प्रेमी ने प्रेम संबंध के विरोध में अपने पिता की हत्या कर दी। उन्होंने उसे जहर दिया। तीन साल पहले हुए इस अपराध को अब सुलझा लिया गया है, जिसमें एक नाबालिग सहित चार गिरफ्तारियां हुई हैं।