'बाबा, मला घेऊन जा, हे मला मारून टाकतील'; फोन ठेवताच इन्स्टाग्राम स्टारचा सासरी संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:35 IST2026-05-19T15:32:48+5:302026-05-19T15:35:49+5:30
सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेने आपलं आयुष्य संपवल्याची घटना मध्य प्रदेशात घडली.

'बाबा, मला घेऊन जा, हे मला मारून टाकतील'; फोन ठेवताच इन्स्टाग्राम स्टारचा सासरी संशयास्पद मृत्यू
Palak Rajak Death: "बाबा, मला इथून कसंही करून घेऊन जा... सासरचे लोक मला गाडी आणि सोन्याच्या साखळीसाठी सतत त्रास देत आहेत. तीन दिवसांपासून मला धड जेवणही मिळालेलं नाही, घरातलं कोणी माझ्याशी बोलत नाहीये. हे लोक मला जिवंत सोडणार नाहीत, मला मारून टाकतील..." हे काळीज पिळवटून टाकणारे शब्द होते २० वर्षीय पलक रजकचे. आपल्या वडिलांशी फोनवर बोलताना पलक ढसाढसा रडत होती आणि सुटकेची मागणी करत होती. मात्र दुर्दैवाने या फोननंतर अवघ्या २० मिनिटांतच पलकचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी माहेरच्यांना मिळाली.
अवघ्या वर्षभरात सुखाचा संसार उद्ध्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अमित रजक याच्याशी पलकचा विवाह एप्रिल २०२५ मध्ये थाटामाटात झाला होता. अमित हा महाराजपुरा एअरबेसवर कंत्राटी पद्धतीने काम करतो. लग्नात पलकच्या वडिलांनी सोने-चांदी, मोटारसायकल आणि इतर साहित्य दिले होते. तसेच लग्नात दिलेले फिक्स डिपॉझिटचे पैसेही सासरच्यांनी काढून घेतले होते. एवढे देऊनही सासरच्यांचे समाधान झाले नाही. लग्न झाल्यापासूनच पती अमित, सासू आणि दीर यांनी पलककडे आलिशान कार आणि सोन्याच्या चेनची मागणी लावून धरली होती.
'त्या' फोननंतर २० मिनिटांतच खेळ संपला
१२ मे च्या रात्री पलकनेने रडत रडत आधी वडिलांना आणि नंतर भाऊ प्रिन्सला फोन केला. ती अत्यंत घाबरलेली होती आणि सासरचे लोक आपल्याला मारून टाकतील अशी भीती व्यक्त करत होती. लेकीचा रडण्याचा आवाज ऐकून वडिलांनी तात्काळ भाऊ प्रिन्सला तिला आणण्यासाठी सासरी पाठवले. प्रिन्स बहिणीला आणण्यासाठी घराबाहेर पडलाच होता, तितक्यात अवघ्या २० मिनिटांत पलकचा पती अमितचा फोन आला आणि त्याने सांगितले की पलकने गळफास लावून आत्महत्या केली. प्रिन्स तात्काळ रुग्णालयात पोहोचला, तेव्हा पलकचा मृतदेह तेथील स्ट्रेचरवर पडलेला होता.
मृतदेहावर जखमांच्या खुणा
पलकच्या नातेवाईकांनी सासरच्यांवर हत्येचा थेट आरोप केला आहे. पलकने आत्महत्या केली नसून, तिची गळा दाबून हत्या करण्यात आली, असा दावा माहेरच्यांनी केला आहे. पलकच्या पायावर, मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमांच्या खुणा आढळल्या. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तसेच संपूर्ण शवविच्छेदनाचे व्हिडिओ शूटिंग करावे आणि फॉरेन्सिक तपासणी करावी, अशी मागणी केली.
'तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले'
दुसऱ्या बाजूला, सासरच्या लोकांनी हुंड्याचा आणि छळाचा आरोप फेटाळून लावला. पलकचे सासरे बाबूलाल यांनी पोलिसांना सांगितले की, ते बाजारातून परत आले तेव्हा लहान मुलाने पलक खोलीचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. दरवाजा तोडून आत पाहिले असता ती छताच्या पंख्याला लटकलेली दिसली, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
इंस्टाग्राम रिल्स स्टार होती पलक
पलक ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. इंस्टाग्रामवर ती रिल्स बनवून पोस्ट करायची, जिथे तिचे जवळपास १०,००० फॉलोअर्स होते. ऑनलाइन अत्यंत आनंदी दिसणाऱ्या पलकच्या आयुष्यात सासरी एवढे मोठे वादळ सुरू असेल, याची कल्पना तिच्या फॉलोअर्सनाही नव्हती.