रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:16 IST2026-04-28T10:16:09+5:302026-04-28T10:16:48+5:30
गोरखपूरमध्ये एका ज्वेलरी शोरुममधून सोन्याच्या दागिन्यांचं पाकीट घेऊन पळणाऱ्या चोराशी शोरुम मालकाच्या मुलीने दोन हात केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका ज्वेलरी शोरुममधून सोन्याच्या दागिन्यांचं पाकीट घेऊन पळणाऱ्या चोराशी शोरुम मालकाच्या मुलीने दोन हात केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. या धाडसी मुलीने एका लुटारूला पकडलं आणि भर रस्त्यावर सर्वांसमोर लोळवलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरच्या गोला पोलीस ठाणे हद्दीतील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये दोन चोर ग्राहक बनून ज्वेलरी शोरूममध्ये आले. दागिने पाहण्याच्या बहाण्याने त्यांनी २० ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले आणि पळू लागले. शोरूममध्ये बसलेल्या सराफाच्या १८ वर्षीय मुलीने प्रसंगावधान राखून चोरांचा पाठलाग केला. तिने एका चोराला पकडलं. यानंतर तो चोर पळून गेला, मात्र या मुलीने बराच वेळ त्याचा पाठलाग केला. चोरांशी भिडताना या तरुणीच्या हाताला दुखापतही झाली आहे.
गोला पोलीस ठाणे हद्दीतील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये राकेश वर्मा यांचं 'देवांश स्वर्णकला केंद्र' नावाचं शोरुम आहे. राकेश हे मोठ्या व्यापाऱ्यांकडून दागिने आणून विकतात. राकेश यांना चार मुली आहेत, त्यापैकी दोन मुलींचं लग्न झालं आहे. तिसऱ्या मुलीचा सृष्टीचा (२२) २९ एप्रिल रोजी साखरपुडा आहे. राकेश हे मुलीच्या साखरपुड्याच्ं आमंत्रण देण्यासाठी बाहेर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची धाकटी मुलगी अमृता (१८) दुकान सांभाळत होती.
बहादुर बेटी का शक्ति-प्रदर्शन!
— Narendra Pratap (@hindipatrakar) April 27, 2026
यूपी- गोरखपुर में ज्वैलरी शोरूम में 2 लुटेरे ग्राहक बनकर आये और बिक्री के दौरान 20 ग्राम सोने के जेवर लूटकर भागने लगे. शोरूम पर बैठी ज्वैलर की बेटी ने साहस दिखाया और लुटेरों का पीछा किया.
एक लुटेरे को उसने पकड़ा और दबोचकर सड़क पर गिरा लिया. उसकी… pic.twitter.com/VwW3CD1Gti
अमृताने सांगितलं की, दुपारी सुमारे २:२० च्या सुमारास दोन तरुण ग्राहक बनून दुकानात शिरले. त्यांनी दागिने दाखवण्यास सांगितले. तिने दागिने दाखवताच एका तरुणाने संधी साधून दागिन्यांवर डल्ला मारला. त्याने सुमारे अडीच ते पावणे तीन लाख रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पळवले. त्यानंतर तो दुकानातून पळू लागला. अमृताने धावून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला.
एसपी दिनेश पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार की, २७ एप्रिल रोजी दुपारी २:२० वाजता गोला पोलीस ठाणे हद्दीतील एका ज्वेलरी शोरुममध्ये दोन अज्ञात व्यक्ती चांदीची अंगठी पाहण्याच्या बहाण्याने सोन्याच्या दागिन्यांचे पाकीट घेऊन पळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी चौकशी केली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना स्पष्ट दिसत आहे.