बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 13:47 IST2026-04-19T13:43:31+5:302026-04-19T13:47:51+5:30
Father Killed two daughters: पत्नीसोबत सातत्याने होत असलेल्या वादातून पतीने पोटच्या दोन मुलीची गळा कापून हत्या केली. कानपूरमध्ये घडलेल्या या घटनेने पोलिसही हादरले.

बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
"तू मुलाला घेऊन कुठेही निघून जा, मी माझ्या मुलींचा सांभाळ करेन", असे पती सातत्याने पत्नीला म्हणायचा. पतीचे हे नेहमीचे टोमणे आणि भांडणं. पण, पत्नीच्या चारित्र्यावरील संशय आणि भांडणातून पतीने राक्षसी कृत्ये केले. रिद्धी आणि सिद्धी या दोन मुलींची गळा कापून हत्या केली. कानपूरमधील किडवई नगरमध्ये ही खळबळ उडवून देणारी घटना घडली.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये किडवई नगरमध्ये त्रिमूर्ति अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर जी४ हे कुटुंब राहते. आरोपी शशी रंजन मिश्रा याने रविवारी पहाटे ४.३० वाजता कॉल करून पोलिसांना सांगितले की, त्याने आपल्या दोन मुलींची हत्या केली.
सगळ्या खोलीत रक्ताचा सडा
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस त्या खोलीत गेले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. खोलीमध्ये सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता. फरशी आणि बेड रक्ताने माखून गेली होती. ११ वर्षांच्या जुळ्या बहिणींचे मृतदेह फरशीवर पडलेले होते. रिद्धी आणि सिद्धी यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्या मृतदेहांच्या बाजूला आरोपी बाप बसलेला होता.
बेडरुम ते किचन सगळीकडे सीसीटीव्ही
आरोपीची पत्नी रेशमा यांनी सांगितले की, पतीने घरात सगळीकडे सीसीटीव्ही लावले आहेत. घरात प्रवेश करण्याच्या दरवाजापासून ते किचन, बेडरुमपर्यंत सगळ्या कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही आहेत.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी शशी रंजन मिश्रा हा सातत्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यावरून वाद होत असे. पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी शशी रंजन मिश्रा याने संपूर्ण घरात सीसीटीव्ही लावले होते. कळस म्हणजे तो मुलींच्या खोलीत रेशमा यांना जाऊच देत नव्हता. रेशमा या सीसीटीव्हीचे फुटेज दिसणाऱ्या टीव्हीवरूनच मुलींना बघायची.
रेशमा यांनी दरवाजाला कान लावून अंदाज घेतला, पण...
रेशमा यांनी पोलिसांना सांगितले की, शनिवारी रात्री सर्व काही व्यवस्थित आहे, असे वाटले. शशीने जेवण केले आणि तो मुलींना घेऊन झोपण्यासाठी खोलीत निघून गेला. रात्री २.३० वाजता तो लहान मुलीला वॉशरुमला घेऊन गेला. त्यानंतर परत खोलीत गेला.
खोलीत गेल्यानंतर शशीने खोलीतील लाईट बंद केले. त्यानंतर रेशमाने खोलीत काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी दरवाजाला कान लावून अंदाज घेतला. आतून कोणताही आवाज न आल्याने तिघेही झोपले आहे, असे समजून रेशमा या परत झोपायला गेल्या.
त्यानंतरच बापाने दोन मुलींना संपवले. आरोपी शशीने धारदार शस्त्राने दोन्ही मुलीचे गळे चिरले. दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने पोलिसांना कॉल करून याची माहिती दिली.
संशय आणि मानसिक तणाव
पोलिसांनी सांगितले की आरोपीला अटक करण्यात आले आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.