धुळे हादरले! पिंपळनेरच्या हळदी समारंभात तुफान हाणामारी; किरकोळ वादातून तिघांची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:40 IST2026-02-19T16:39:43+5:302026-02-19T16:40:53+5:30
जिल्हा हादरला, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

धुळे हादरले! पिंपळनेरच्या हळदी समारंभात तुफान हाणामारी; किरकोळ वादातून तिघांची निर्घृण हत्या
पिंपळनेर, ता. साक्री: येथे एका लग्नसमारंभाच्या आनंदावर विरजण पडले असून, हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरदेवाच्या बाजूकडील लोकांनी केलेल्या मारहाणीत नवरीकडील तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेचा थरार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपळनेर येथे गोसावी समाजाचा विवाह सोहळा सुरू होता. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना नवरदेव आणि नवरीकडील पाहुण्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर बघता-बघता हिंसक हाणामारीत झाले. नवरदेवाच्या बाजूने आलेल्या काही तरुणांनी नवरीकडील मंडळींवर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत: सुरेश सुपडुगिर गोसावी (रा. साक्री), साहील सुरेशगिर गोसावी (रा. साक्री), देवा रवींद्र पवार (रा. साक्री) अशी आहे.
जिल्हा हादरला, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लग्नासारख्या पवित्र कार्यात ही घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रकोळ वादातून इतके टोकाचे पाऊल उचलले गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.