Jharkhand Crime:झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अमृत दास यांचा मृतदेह घरात संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी मृत नेत्याच्या आई आणि बहिणीने त्यांच्या दोन्ही पत्नींवर हत्येचा गंभीर आरोप केला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनबादच्या गोविंदपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या उपर बाजार परिसरात अमृत दास यांचे घर आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्याच घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गोविंदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
दोन सख्ख्या बहिणींशी विवाह आणि घरगुती वाद
अमृत दास यांच्या मृत्यूमागे घरगुती वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, अमृत दास यांनी दोन सख्ख्या बहिणींशी विवाह केला होता आणि ते सर्व एकाच घरात राहत होते. मात्र, दोन्ही पत्नींमध्ये वारंवार खटके उडत असत. या कौटुंबिक वादांमुळे अमृत दास मानसिक तणावाखाली होते आणि गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही दूर होते.
शॉपिंग ठरली वादाचे कारण?
स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी म्हणजेच गुरुवारी, अमृत दास आपल्या दुसऱ्या पत्नीला बाजारामध्ये शॉपिंग करण्यासाठी घेऊन गेले होते. या गोष्टीवरून त्यांची पहिली पत्नी प्रचंड संतापली होती. या कारणावरून घरात मोठे भांडण झाले आणि हा वाद विकोपाला गेला. या वादाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी अमृत दास यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले.
कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
अमृत दास यांच्या आई आणि बहिणीने थेट त्यांच्या दोन्ही पत्नींवर आरोप केला आहे. दोन्ही पत्नींनी मिळून अमृतची हत्या केली आहे, असा दावा त्यांनी केला असून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, गोविंदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विष्णू प्रसाद रावत यांनी सांगितले की, पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. तसेच घराच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दोन्ही पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांची कसून चौकशी सुरू असून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. "हा प्रकार हत्या आहे, आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितले.
Web Summary : Jharkhand: BJP leader Amrit Das found dead. Family alleges murder by his two wives. A shopping dispute preceded the death. Police investigate.
Web Summary : झारखंड: भाजपा नेता अमृत दास मृत पाए गए। परिवार ने दो पत्नियों द्वारा हत्या का आरोप लगाया। शॉपिंग विवाद मौत से पहले हुआ। पुलिस जांच कर रही है।