प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 18:01 IST2026-04-22T18:00:45+5:302026-04-22T18:01:47+5:30
ऑटोचालकाच्या पत्नीने 'भाऊ' मानलेल्या मित्रासोबत पळून जाऊन केले लग्न, सोबत घरातील दागिनेही नेले!

प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका ऑटोचालकाच्या नशिबी फसवणूक आली. पत्नीने आपल्याच पतीच्या मित्रासोबत पळून जाऊन लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील बन्नंगडी गावात समोर आला आहे. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीसोबत ती पळून गेली, त्याला ती स्वतःचा 'भाऊ' म्हणून संबोधत होती. या प्रकाराने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
कॉलेजमधील प्रेम आणि दोन वर्षांचा संसार
ऑटोचालक सागर आणि रक्षिता यांची ओळख कॉलेजच्या दिवसांत झाली होती. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी घरच्यांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा संसार आनंदाने सुरू होता. मात्र, रक्षिताचा कल सागरचा मित्र इंद्र याच्याकडे झुकू लागला होता. आश्चर्याची बाब म्हणजे, रक्षिता या इंद्रला सर्वांसमोर 'भाऊ' म्हणून ओळख करून देत होती, मात्र आतल्या गाठी त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते.
पळताना लुटले दागिने आणि रोख रक्कम
सागरने दिलेल्या तक्रारीनुसार, रक्षिता अचानक घर सोडून पळून गेली. जाताना तिने घराची तिजोरी रिकामी केली असून, १ लाख रुपये रोख आणि २२ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. रक्षिताने पळून गेल्यानंतर मंदिरात इंद्रसोबत लग्न केले आणि या लग्नाचे फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवले. हे स्टेटस पाहताच सागरच्या पायाखालची जमीनच सरकली.
न्यायासाठी पोलिसांचे दार ठोठावले
आपल्या पत्नीच्या या कृत्याने सागर पुरता खचला आहे. या घटनेमुळे सागर आणि त्याच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे. सागरने आता मांड्या ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. "ती ज्याच्यासोबत गेली, त्याच्यासोबत खुश राहो, मला काही देणे-घेणे नाही. मात्र, मला तिच्यापासून त्वरित घटस्फोट हवा आहे आणि माझ्या हक्काचे पैसे व दागिने परत मिळवून द्या," अशी मागणी सागरने पोलिसांकडे केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.