तलावात उडी मारुनही वाचला नाही जीव; जमावाच्या क्रूरतेचा बळी ठरलेल्या खोकन दास यांचा रुग्णालयात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:25 IST2026-01-03T14:24:28+5:302026-01-03T14:25:18+5:30
बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अमानुष हल्ल्यांनी आणखी एक बळी घेतला आहे.

तलावात उडी मारुनही वाचला नाही जीव; जमावाच्या क्रूरतेचा बळी ठरलेल्या खोकन दास यांचा रुग्णालयात मृत्यू
बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अमानुष हल्ल्यांनी आणखी एक बळी घेतला आहे. ढाकापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या गावात औषधं आणि मोबाईल बँकिंगचा व्यवसाय करणारे खोकन चंद्र दास यांच्यावर बुधवारी रात्री इस्लामिक कट्टरपंथियांनी जीवघेणा हल्ला केला होता. हल्लेखोरांनी त्यांच्यावर केवळ धारदार शस्त्रांनी वार केले नाहीत, तर त्यांना जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला.
खोकन चंद्र दास यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, बुधवारी रात्री दुकान बंद करून घरी परतत असताना त्यांच्यावर हा भयंकर हल्ला झाला. या हल्ल्यात गंभीररीत्या भाजलेल्या खोकन यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या तलावात उडी मारली, ज्यामुळे आग विझली. मात्र, तोपर्यंत त्यांचा चेहरा आणि डोकं पूर्णपणे भाजलं होतं.
स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना ढाका येथे हलवण्यात आलं, जिथे शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. खोकन दास हे त्यांच्या गावात औषधं आणि मोबाईल बँकिंगचा छोटा व्यवसाय करत असत. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
या घटनेवर पश्चिम बंगाल भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. हा हिंसाचार धार्मिक आधारावर होत असल्याचं भाजपाने म्हटलं. बांगलादेश आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी ही गोष्ट चिंताजनक पद्धतीने सुरू आहे. गेल्या वर्षी मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हत्यांचा संदर्भ देत पक्षाने म्हटलं की, बंगाली हिंदूंवर होणारे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारच्या काळात अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. मुस्लिम बहुल बांगलादेशात धार्मिक कारणांमुळे जीवघेणे हल्ले झालेल्या हिंदूंच्या यादीत आता खोकन दास यांचे नाव जोडले गेले आहे. यापूर्वी १८ डिसेंबर २०२५ रोजी दीपू चंद्र दास यांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती.