दत्तक घेतलेल्या मुलीने संपत्तीसाठी आईचा काटा काढला; नंतर चायनीज खात बसली, १२ लाखांची दिली सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 16:18 IST2026-04-29T16:12:00+5:302026-04-29T16:18:43+5:30

रांचीमध्ये दत्तक घेतलेल्या मुलीने आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Adopted Daughter Plots Mother Murder for Property Hides Body in Freezer Before Faking Accidental Death | दत्तक घेतलेल्या मुलीने संपत्तीसाठी आईचा काटा काढला; नंतर चायनीज खात बसली, १२ लाखांची दिली सुपारी

दत्तक घेतलेल्या मुलीने संपत्तीसाठी आईचा काटा काढला; नंतर चायनीज खात बसली, १२ लाखांची दिली सुपारी

Ranchi Crime: ज्या महिलेने पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं, त्याच दत्तक मुलीने संपत्तीच्या हव्यासापोटी आईची निर्घृण हत्या केल्याची घटना रांचीमध्ये  उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, आईची हत्या केल्यानंतर ही मुलगी घरी आरामात बसून ऑनलाइन चायनीज आणि मिठाई मागवून खात होती, ज्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला.

नाहिदा परवीन या आपल्या १७ वर्षीय दत्तक मुलीसोबत मणि टोला भागात राहत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. ते वीज विभागात कार्यरत होते. पतीच्या निधनानंतर नाहिदा यांना सुमारे ४५ लाख रुपये आणि पेन्शन मिळत होती. हीच रक्कम आणि मालमत्ता हडपण्यासाठी मुलीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आईच्या हत्येचा कट रचला.

१२ लाखांची सुपारी आणि हत्येचा कट

मिळालेल्या माहितीनुसार, नाहिदा यांच्या मुलीचे अरबाज नावाच्या तरुणावर प्रेम होते. नाहिदा यांचा या प्रेमसंबंधांना विरोध होता, कारण मुलगी पेन्शनचे पैसे प्रियकराला देत असे. या वादातून मुलीने प्रियकर अरबाज आणि समीर खान नावाच्या साथीदाराला १२ लाख रुपयांची सुपारी देऊन आईची हत्या करायला सांगितली. शुक्रवारी रात्री नाहिदा यांना घरात बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली.

पुराव्यांची विल्हेवाट आणि बाथरूमची अफवा

आईचा मृत्यू झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मुलीने मृतदेह घरातील डीप फ्रीजरमध्ये ठेवला. त्यानंतर नातेवाईकांना फोन करून आई बाथरूममध्ये पडून मरण पावली, अशी खोटी माहिती दिली. नातेवाईकांनीही तिच्यावर विश्वास ठेवून रविवारी मृतदेहाचे दफन केले.

नाहिदा यांचे काही नातेवाईक उत्तर प्रदेशातून आले होते. त्यांनी दफन करण्यापूर्वी नाहिदा यांच्या गळ्यावर जखमेचे निशाण आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा पाहिल्या होत्या. संशय बळावल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व सत्य सांगितले.

दफन केलेला मृतदेह बाहेर काढला

सत्य समोर आल्यानंतर दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाहिदा यांचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

अंगावर काटा आणणारे क्रौर्य

नाहिदा यांनी ज्या मुलीला अवघ्या ६ महिन्यांची असताना दत्तक घेतले होते, तिचे क्रौर्य पाहून शेजारीही अवाक झाले आहेत. ज्यावेळी घरात आईचा मृतदेह पडलेला होता, त्यावेळी ही मुलगी बाहेरून जेवण मागवून खात होती. पोलिसांनी आतापर्यंत प्रियकर अरबाज आणि समीरला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title : संपत्ति के लिए दत्तक पुत्री ने की माँ की हत्या, फिर खाया चाइनीज़

Web Summary : रांची में, एक दत्तक पुत्री ने संपत्ति के लालच में अपनी माँ की हत्या कर दी, हत्यारों को काम पर रखा। फिर उसने बेफिक्री से चाइनीज़ खाना ऑर्डर किया जबकि शव फ्रीजर में था। पुलिस ने पुत्री और साथियों को गिरफ्तार किया।

Web Title : Adopted Daughter Murders Mother for Property, Orders Chinese Food After

Web Summary : In Ranchi, an adopted daughter murdered her mother for property, hiring hitmen. She then casually ordered Chinese food while the body was in the freezer. Police arrested the daughter and accomplices.