ज्याला भाऊ मानलं त्यालाच संपवलं! पोलीस अधिकाऱ्याच्या वहिनीने परदेशात दिली सुपारी; एन्क्रिप्टेड ॲपवर कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:03 IST2026-05-06T15:02:21+5:302026-05-06T15:03:56+5:30
चंदीगडमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका हत्याकांडाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आलं.

ज्याला भाऊ मानलं त्यालाच संपवलं! पोलीस अधिकाऱ्याच्या वहिनीने परदेशात दिली सुपारी; एन्क्रिप्टेड ॲपवर कट
Chandigarh Crime: चंदीगडमध्ये भरदिवसा झालेल्या चमनप्रीत सिंह उर्फ चिन्नी या प्रॉपर्टी डीलरच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. हे केवळ साधे हत्याकांड नसून, एका हायप्रोफाईल महिलेने गँगस्टरच्या मदतीने रचलेला कट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने मुख्य सूत्रधार अमरीन कौर आणि तिचा साथीदार हर्षप्रीत सिंह याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अमरीन ही पंजाबमधील एका एडीजीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची वहिनी आहे.
नेमकं प्रकरण काय?
१८ मार्च २०२६ रोजी सेक्टर-९ मधील एका जिमच्या पार्किंगबाहेर चमनप्रीत सिंहची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान, न्यू चंदीगडमधील एका महागड्या जमिनीच्या व्यवहारावरून हा वाद सुरू होता. अमरीनचा आरोप होता की, चिन्नीने तिला फसवून महागड्या दराने जमीन विकली आणि ताबाही दिला नाही, ज्यामुळे तिचे मोठे नुकसान झाले. याच रागातून तिने चिन्नीचा काटा काढण्याचे ठरवले.
गँगस्टर लकी पटियालला दिली सुपारी
अमरीनने चिन्नीच्या हत्येसाठी परदेशात बसलेला कुख्यात गँगस्टर लकी पटियाल याला सुपारी दिली होती. हर्षप्रीत सिंह याने अमरीन आणि गँगस्टरमध्ये मध्यस्थी केली. डिब्बा कॉल आणि एन्क्रिप्टेड ॲप्सच्या माध्यमातून त्यांचे संभाषण व्हायचे, जेणेकरून पोलिसांना सुगावा लागू नये. हत्येसाठी वापरलेले पिस्तूलही अमरीनच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
"ज्याला भाऊ मानलं, त्यानेच विश्वासघात केला"
चिन्नीचा भाऊ दीपेंद्र सिंह याने धक्कादायक माहिती दिली. "अमरीनने आमच्या कुटुंबाचा विश्वास जिंकला होता, ती घरच्या सदस्यासारखी होती. माझा भाऊ अमरीनच्या मुलाला स्वतःच्या लहान भावासारखं मानायचा. तिने ५ कोटी रुपये गुंतवले होते, पण पुढचे १० कोटी रुपये ती उभे करू शकली नाही. माझ्या भावाने फायनान्सरकडून पैसे मिळवून देऊन तिला व्यवहार पूर्ण करण्यास मदत केली, तरीही तिनेच त्याचा जीव घेतला," असा आरोप दीपेंद्रने केला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत राहुल शर्मा, कमल सैनी, विकास राणा, जानू मलिक, हर्षप्रीत, अमरीन, राजन आणि प्रीतम या ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अमरीनच्या नावावर असलेले .४५ बोरचे इम्पोर्टेड पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहेत. मुख्य शूटर राजन आणि प्रीतम यांनी सांगितले की हत्येपूर्वी ते कजहेडी येथे थांबले होते, जिथे त्यांना बाईक, शस्त्रे आणि पैसे पुरवण्यात आले.
वृद्ध आई-वडिलांचा टाहो
चिन्नीचे वडील संत सिंह भावूक होऊन म्हणाले, "आमचा मुलगा तर परत येणार नाही, पण ज्यांनी हे पाप केलं त्यांना सोडू नका. मी आणि माझी पत्नी रात्रंदिवस चिन्नीच्या आठवणीत रडतोय. त्याचा स्वभाव आणि प्रेम आम्ही कधीच विसरू शकणार नाही."
पोलिस आता या हत्येसाठी दिलेली सुपारीची रक्कम गँगस्टरपर्यंत कशी पोहोचली, याचा तपास करत आहेत. या हाय-प्रोफाईल हत्याकांडामुळे चंदीगडमधील गँगस्टर कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.