पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात गुंडांच्या टोळक्याचा धुडगूस; ३० ते ४० वाहनांची केली तोडफोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:28 IST2021-01-28T16:26:41+5:302021-01-28T16:28:00+5:30

याप्रकरणी पोलिसांनी केली चार जणांना अटक

30 to 40 vehicles broken by a criminal mob in the marketyard area | पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात गुंडांच्या टोळक्याचा धुडगूस; ३० ते ४० वाहनांची केली तोडफोड 

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात गुंडांच्या टोळक्याचा धुडगूस; ३० ते ४० वाहनांची केली तोडफोड 

पुणे : मार्केट यार्ड येथे बुधवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीत १० ते १५ जणांच्या टोळक्याने त्याच परिसरातील ३० ते ४० वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच एका किराणा मालाच्या दुकानावर व वडापाव आणि कबाब विकणाऱ्या स्टॉल वर हल्ला चढवत त्यातील रोख रक्कम लंपास केली आहे. आणि त्यानंतर मुस्तफा शेख (रा.आंबेडकरनगर झोपडपट्टी) यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. 

याप्रकरणी कलीम बाबू शेख वय ४७ रा. गल्ली क्र. १६ आंबेडकरनगर) यांनी मार्केट यार्डपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किरण थोरात (वय २५ रा. आंबेडकरनगर), सचिन माने (वय २२ रा. महर्षी नगर), सोमनाथ शिंदे (वय २१ रा. आंबेडकरनगर) ,सौरभ आदमाने (वय २५ रा. गुलटेकडी) या आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना केल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड येथील आंबेडकर झोपडपट्टी परिसरात टोळक्याने एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दुचाकी, तीनचाकी, टेम्पो व चारचाकी वाहनांना लक्ष्य करत वाहनांची तोडफोड करत प्रचंड नुकसान सुद्धा केले. यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. 
 

Web Title: 30 to 40 vehicles broken by a criminal mob in the marketyard area