वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आता पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: August 13, 2014 01:44 IST2014-08-13T01:30:41+5:302014-08-13T01:44:07+5:30
औरंगाबाद : विद्यापीठातील एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम मागील काही वर्षांपासून शहरातील एका खाजगी स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सुरू आहे

वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आता पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण व विस्तार विभागात ‘अपंगांचे समाजस्थित पुनर्वसन’ हा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम मागील काही वर्षांपासून शहरातील एका खाजगी स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सुरू आहे; पण आता या संस्थेनेच आपला गाशा गुंडाळला असल्यामुळे शंभर टक्के नोकरीची हमी देणारा हा अभ्यासक्रम पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे.
आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ. किशन धाबे यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठात ‘अपंगींचे समाजस्थित पुनर्वसन’ हा एक वर्ष कालावधीचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला. आतापर्यंत तीन बॅच यशस्वीपणे पदविका घेऊन बाहेर पडल्या आहेत. कोणत्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. आतापर्यंत ७५ पैकी ५५ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. सध्या चौथी बॅच शिक्षण घेत असून पाचव्या बॅचसाठी २५ आॅगस्टपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी सुरू आहे.
देशातील हे तिसरे विद्यापीठ
‘अपंगांचे समाजस्थित पुनर्वसन’ हा कोर्स चालविणारे हे तिसरे विद्यापीठ आहे. देशातील बंगळुरू, उदयपूर येथील राजस्थान विद्यापीठ आणि औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या तीनच विद्यापीठांत हा अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमाला नवी दिल्ली येथील भारतीय पुनर्वास परिषदेची मान्यता आहे.
‘यूजीसी’चे अनुदान नाही
या अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोग किंवा अन्य कोणत्याही सरकारी संस्थेचे अनुदान मिळत नाही. तरीदेखील मागील चार-पाच वर्षांपासून हा अभ्यासक्रम टिकवून ठेवण्याची कसरत संचालक डॉ. धाबे यांनी सुरू ठेवली असून, शहरातील ‘जनार्थ’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने काही डॉक्टर्स हे विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम निरंतरपणे करीत आहेत.