छ. संभाजीनगरात तीन वर्षांनंतरही पहिलीच पीटलाइन पूर्ण होईना, दुसऱ्या २४ बोगींचा प्रस्ताव आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:45 IST2026-05-04T16:43:59+5:302026-05-04T16:45:02+5:30
स्टेशनवर १६ बोगींची पीटलाइन रेंगाळत, कागदावर २४ बोगींची नवीन पीटलाइन

छ. संभाजीनगरात तीन वर्षांनंतरही पहिलीच पीटलाइन पूर्ण होईना, दुसऱ्या २४ बोगींचा प्रस्ताव आला
-संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगररेल्वे स्थानकावर १६ बोगींच्या ‘पीटलाइन’च्या कामासाठी एक वर्षाची मुदत होती. प्रत्यक्षात तीन वर्षे उलटूनही पीटलाइनचे काम पूर्ण झालेले नाही. ‘पीटलाइन’चे काम आता डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन रेल्वे प्रशासनाने ठेवली आहे. या सगळ्यात नवीन २४ बोगींची पीटलाइनही रेल्वेकडून प्रस्तावित केली. परंतु पहिलीच पीटलाइन पूर्ण झालेली नसताना दुसरी पीटलाइन कधी होईल, असा सवाल उपस्थित होत आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील आणि जालना येथील पीटलाइनच्या पायाभरणीचा समारंभ झाला. पायाभरणीच्या तब्बल सहा महिन्यांनंतर एप्रिल २०२३ मध्ये संभाजीनगर रेल्वे स्थानकावर पीटलाइनच्या कामाला सुरुवात झाली. हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. परंतु, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीत कागदावरील दुसरी पीटलाइन नजीकच्या काळात होणे अशक्य असल्याचे रेल्वे संघटनांचे म्हणणे आहे.
...तर २४ बोगींची पीटलाइन
छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर १६ बोगींची पीटलाइन होत आहे. मात्र, रेल्वे स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित केल्यास २४ बोगींची पीटलाइनची होऊ शकते. त्यातून नव्या सुविधा देता येतील, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते. त्यानुसार मालधक्का दौलताबादला स्थलांतरित झाल्यानंतर बाजूलाच आणखी एक पीटलाइन होईल.
पीटलाइन रखडून ठेवली
छत्रपती संभाजीनगरला २४ कोचची दुसरी पीटलाइन होणार आहे. त्याचा प्लॅन तयार आहे. दुसऱ्या पीटलाइनसाठी आधी मालधक्का दौलताबादला हलविणे आवश्यक आहे. १६ बोगींच्या पीटलाइनची सुरक्षा चाचणी मात्र अधिकाऱ्यांनी काही ना काही करणे देऊन रखडून ठेवली आहे. त्यामुळे पहिल्या पीटलाइनचाच पत्ता नाही, दुसरी मात्र कागदावर अवतरली असे म्हणावे लागेल.
- डॉ. स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक