सावधान! रेल्वे प्रवासात खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन लूट; महिला आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:16 IST2026-04-28T12:15:53+5:302026-04-28T12:16:33+5:30
"साईनगर शिर्डी - काकीनाडा एक्सप्रेसमध्ये दिला होता गुंगीचा डोस!" सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनने लावला छडा.

सावधान! रेल्वे प्रवासात खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन लूट; महिला आरोपीला अटक
छत्रपती संभाजीनगर :रेल्वे प्रवासात प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुबाडणाऱ्या फरार महिलेला अखेर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत झालेल्या या कारवाईत सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून आरोपी महिलेला २६ एप्रिल रोजी ताब्यात घेत मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या नांदेड येथील ‘सीआयबी’ आणि लोहमार्ग पोलिस यांनी ही कारवाई केली. तिच्याकडून १ लाख ४० हजार ८६० इतकी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाइल फोन तसेच इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. हा प्रकार ५ एप्रिल रोजी साईनगर शिर्डी - काकीनाडा एक्सप्रेसच्या महिला बोगीत छत्रपती संभाजीनगर ते परभणी प्रवासादरम्यान घडला होता. एका महिला प्रवाशाला नशा देऊन तिच्याकडील अंदाजे २.५ लाखांचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले होते. सदर माहिती मिळताच नांदेड येथील ‘सीआयबी’ आणि लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने तपास सुरू करून पीडित प्रवाशाकडून आरोपीचे वर्णन घेतले. संबंधित रेल्वेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. यात एक संशयित महिला आढळून आली. पीडित प्रवाशाला तिचे छायाचित्र दाखविले असता तिने त्या महिलेची ओळख पटवली.
आरोपीचा शोध घेण्यासाठी तिचे छायाचित्र भुसावळ, पुणे, मुंबई, नांदेड, सोलापूर आदी जवळच्या रेल्वे विभागांना पाठविण्यात आले. २५ एप्रिल रोजी आरोपी महिलेचे मोबाइल लोकेशन सिकंदराबाद येथे आढळले. ही माहिती तत्काळ सिकंदराबाद रेल्वे सुरक्षा बलाला देण्यात आली. त्यांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले व लोहमार्ग पोलिसांकडे सुपुर्द केले. आरोपीला पुढील तपासासाठी छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपी महिलेकडून जप्त मुद्देमाल
- रोख रक्कम : १ लाख ४० हजार ८६० रु.
- मोबाइल फोन : नोकिया (ब्लॅक अँड व्हाईट)
- सोने/पिवळ्या रंगाचे कानातील व गळ्यातील दागिने (मूल्य निश्चित करणे बाकी)
- आधार कार्ड, गोळ्या व औषधे इत्यादी.