जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस
By Admin | Updated: October 27, 2014 00:11 IST2014-10-26T23:56:57+5:302014-10-27T00:11:25+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवार सकाळपासून ढग दाटून आल्याने शनिवारी दुपारुन आणि रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही़ रविवारी दिवसभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत होत्या़

जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस
लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवार सकाळपासून ढग दाटून आल्याने शनिवारी दुपारुन आणि रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही़ रविवारी दिवसभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत होत्या़ त्यातच अंगाला झोंबणारा गारवा असल्याने शहरातील वर्दळही ओसरली होती़ जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पावसाच्या सरी दिवसभर अधूनमधून बरसत होत्या़ शनिवारपासून जिल्ह्यात ही परिस्थिती असून कडाक्याचा गारवा अंगाला झोंबणारा होता़
लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, शिरुर अनंतपाळ, जळकोट, देवणी, चाकूर, लातूर तालुक्यात रविवारी रिमझिम पाऊस होता़ लक्ष्मी पूजनानंतर नभं दाटून आले़ शनिवारी पाऊस झाला नाही़ परंतु रविवारी दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून बरसत होत्या़ पावसाअभावी जिल्ह्यात रबीच्या पेरण्या अद्याप सुरु झाल्या नाहीत़ या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे़ मात्र मोठा पाऊस नसल्यामुळे ओल जमिनीत नाही़ त्यामुळे या पावसावर रबीच्या पेरण्या होणे शक्य नाही़ थोडा मोठा पाऊस झाल्यानंतर पेरण्यांना प्रारंभ होईल, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले़ खरीपातील तुरीच्या पिकाला हा पाऊस दिलासादायक आहे़ पावसाळ्यातही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यामुळे खरीपाच्या पिकातील उतारा घटला आहे़ सोयाबीनचा उतारा गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमीच असून खरीप गेले़ रबीच्या पेरणीसाठी तरी पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात आशादायक वातावरण असल्याने बळीराजा सुखावला आहे़ रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. परंतु, त्यात गारवा असल्याने रोगराईला निमंत्रणच आहे़ लातूर शहरात रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही़ वातावरणातला गारवा अंगाला झोंबणारा असल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्यच होते़ भाजी मार्केट, गंजगोलाईतील कापड बाजार, सराफा लाईन व नेहमी वर्दळ असलेल्या भागात रविवारी गारवा व रिमझिम पावसामुळे वर्दळ नव्हती़ यामुळे ऊबदार कपड्याच्या बाजारात मात्र तुरळक गर्दी दिसली़ (प्रतिनिधी)