कोरोनावर मात केलेल्या ३१ टक्के रुग्णांकडून वजन वाढल्याच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:52+5:302021-02-05T04:22:52+5:30
औरंगाबाद : कोरोनासारख्या महाभयंकर आजाराच्या विळख्यातून हजारो रुग्ण सुखरुप बाहेर पडले. कोरोनावर मात केली. पण, त्यानंतर या आजारामुळे निर्माण ...

कोरोनावर मात केलेल्या ३१ टक्के रुग्णांकडून वजन वाढल्याच्या तक्रारी
औरंगाबाद : कोरोनासारख्या महाभयंकर आजाराच्या विळख्यातून हजारो रुग्ण सुखरुप बाहेर पडले. कोरोनावर मात केली. पण, त्यानंतर या आजारामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. वजन वाढ, ही त्यातीलच एक समस्या आहे. कोरोनावर मात केलेल्या तब्बल ३१ टक्के लोकांना वजन वाढीला सामोरे जावे लागत आहे.
घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडीची सुविधा सुरू केली आहे. कोरोनाचे उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांना काही त्रास उद्भवला तर येथे डाक्टरांचा सल्ला घेता येतो. यामध्ये घाटीत पोस्ट कोविड उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. घाटीत गेल्या १० महिन्यांत तब्बल २ हजार २४४ कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. यातील ६९ टक्के म्हणजे एक हजार ५४८ रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. परंतु ३१ टक्के म्हणजे ६९६ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार होते. उपचारादरम्यान आक्सिजन लावण्याची वेळ ओढावली. त्यांनी कोरोनावर मात केली. परंतु वजनवाढीला त्यांना सामोरे जावे लागत आहे.
----
एकूण कोरोना रुग्ण-४६,७६३
बरे झालेले रुग्ण-४५,३९०
वजन वाढल्याच्या तक्रारी असलेले - ६९६
----
१० व्यक्तींमागे ३ ते ४ जणांच्या वजन वाढीच्या तक्रारी.
५० वर्षांवरील व्यक्तींच्या अधिक तक्रारी.
---
आधी ७० नंतर ७५ किलो झाले वजन
१) कोरोना होण्यापूर्वी माझे वजन ७० किलो होते. हे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत होतो. त्यातच कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला खूप भीती वाटली. पण सुदैवाने योग्य वेळी उपचार घेतल्याने कोरोनातून वेळीच बाहेर पडता आले. आधी रुग्णालयात थांबावे लागले. त्यानंतर बरेच दिवस घरीच होतो. त्यामुळे ५ किलो वजन वाढले, असे एका कोरोनामुक्त रुग्णाने सांगितले.
२) वजन वाढल्याचे जाणवल्यानंतर डॉक्टरांना विचारणा केली. त्यांनी वजन नियंत्रणात ठेण्यासाठी काय खावे, काय नाही, हे सांगितले आहे. सकाळी फिरत आहे. पण डॉक्टरांनी फार दम लागेल असा व्यायाम करू नका, असे सांगितले आहे.
३) वजन वाढल्यामुळे सध्यातरी काही त्रास जाणवत नाही. पण खबरदारी म्हणून यापुढे वजन वाढणार नाही आणि सध्या असलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
४) वजन का वाढले, याचा फार विचार केला नाही. अनेक दिवस आराम करावा लागला. शरीराच्या फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे वजन वाढले असेल, असे वाटत असल्याचे कोरोनामुक्त रुग्णाने सांगितले.
-----
स्टेरॉईड दिले जाते, त्यामुळेही वजनात वाढ
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी स्टेरॉईड दिले जाते. त्यामुळे वजन वाढीला हातभार लागतो. रुग्णाला कमीत कमी दहा दिवस डोस दिला जातो, तर गंभीर रुग्णांची प्रकृृृती स्थिर होईपर्यंत स्टेरॉईड द्यावे लागते.
गंभीर रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागतो. अशा रुग्णांना बरे झाल्यानंतर थोडीही हालचाल केली तरी दम लागतो. त्यामुळे ते एकाच जागेवर अनेक दिवस असतात. आहार सुरू, पण शरीराची हालचाल फार होत नसल्यानेही वजन वाढते.
५० वर्षांवरील व्यक्तींचे वजन हे प्रामुख्याने अधिक असल्याचे पाहायला मिळते. त्यांना मधुमेह, रक्तदाब असे विविध आजारही असतात. अशा रुग्णांना कोरोना झाल्यानंतर उपचारानंतर वजन वाढल्याच्या तक्रारी होतात.
---
व्यायाम केल्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांना व्यायाम करणे अवघड होते. अशांनी प्रथिनयुक्त आहार घेण्यास प्राधान्य द्यावे. पिष्टमय पदार्थ टाळले पाहिजेत. अन्नपदार्थांवर वरून मीठ घेऊ नये.
- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी