'आठवडी बाजाराच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव!' दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 20:00 IST2026-04-27T19:59:26+5:302026-04-27T20:00:28+5:30
छ. संभाजीनगरमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयावरून राडा; अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेचे तीव्र आंदोलन.

'आठवडी बाजाराच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव!' दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर: शहरातील विविध भागांत भरणारे पारंपरिक आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा येणार असल्याने, शिवसेना (यूबीटी) आक्रमक झाली आहे. सोमवारी (दि. २७) शहानूरवाडी येथील आठवडी बाजारात अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
बिल्डर लॉबीला फायदा पोहचवण्याचा प्रयत्न?
"महापालिका प्रशासनाने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे. या मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा कट सत्ताधाऱ्यांनी रचला आहे," असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी केला. हे बाजार बंद केल्यास गरिबांवर उपासमारीची वेळ येईल, त्यामुळे हे बाजार आम्ही कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, या जागा अधिकृतपणे 'हॉकर्स झोन' म्हणून जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
बाजारात खरेदी करत साधला संवाद
आंदोलनादरम्यान १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन बाजारात प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी विक्रेत्यांकडून भाजीपाला व इतर वस्तू खरेदी करत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात उपनेते सुभाष पाटील, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.