मराठवाड्याच्या विकासासाठी 'व्हिजन २०२९'; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला पदभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:30 IST2026-04-18T15:28:39+5:302026-04-18T15:30:06+5:30
परभणी ते विभागीय आयुक्त; जी. श्रीकांत यांचा १७ वर्षांचा प्रशासकीय प्रवास आता मराठवाड्याच्या विकासासाठी.

मराठवाड्याच्या विकासासाठी 'व्हिजन २०२९'; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला पदभार
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरची ग्रोथ करण्यावर मोठ्या प्रमाणात भर असेल. येणाऱ्या तीन वर्षांत शहरासह प्राधिकरण हद्दीतील परिसर देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचे योग्य नियाेजन करण्यासाठी प्रयत्न असतील. शिवाय विभागाच्या आठही जिल्ह्यांमधील अडचणी सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे मराठवाड्याचे ३३ वे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताना नमूद केले. मावळते आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त दादासाहेब वानखेडे, अपर आयुक्त सुषमा देसाई, मंजूषा मिसकर, सहआयुक्त राजेश काटकर, सहायक आयुक्त मंजूषा कापसे, सहआयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त सविता हरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविसकर, उपमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाये, सहायक आयुक्त शुभांगी आंधळे, उपमुख्य लेखाधिकारी साधना बांगर यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते.
१०० टक्के ई-ऑफिसवर भर असेल
विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी विभागप्रमुखांशी संवाद साधत मराठवाड्यातील शेती, टंचाईस्थिती तसेच सामाजिक विषय व प्रशासकीय विषयाबाबत माहिती जाणून घेतली. सर्वांनी समन्वयाने काम करून विकास साधूया, असे आवाहन केले. छत्रपती संभाजीनगर विभाग हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा विभाग असून, पर्यटन विकासाला चालना देतानाच शिक्षण, आरोग्य, महत्त्वपूर्ण उपक्रम व रोजगाराभिमुखतेवर भर देण्यात येईल. विभागाला सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करू. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबतच कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून ई-ऑफिस प्रणालीचा १०० टक्के अवलंब करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कामकाजात अंतर्गत समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
२००९ ते २०२६ पर्यंत श्रीकांत यांचा पदप्रवास
जी. श्रीकांत २००९ च्या यूपीएससी बॅचचे अधिकारी आहेत. सुरुवातीला त्यांनी परभणी येथे परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केला. त्यानंतर किनवट येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रथम नियुक्ती झाली. नांदेड-वाघाळा महानगरपालिका आयुक्त, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला व लातूर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी सहआयुक्त तसेच महानगरपालिका आयुक्त या पदांवर त्यांनी काम केले.