शेंद्रा एमआयडीसीतील स्किल सेंटर करिअर घडवण्याचे 'हॉटस्पॉट'; १० प्रकारचे कोर्सेस तेही मोफत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:24 IST2026-04-27T15:23:34+5:302026-04-27T15:24:49+5:30
पदवीधर आणि १० वी-१२ वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी; सोलार पॅनल इन्स्टॉलेशन आणि ईव्ही प्रॉडक्ट डिझाइनच्या कोर्सेसला तरुणांचे प्राधान्य

शेंद्रा एमआयडीसीतील स्किल सेंटर करिअर घडवण्याचे 'हॉटस्पॉट'; १० प्रकारचे कोर्सेस तेही मोफत
छत्रपती संभाजीनगर : गत दोन वर्षांत ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणारे विविध उद्योग आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)ने सहा महिन्यांपूर्वी शेंद्रा एमआयडीसीत सुरू केलेल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: सोलार पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, ईव्ही प्रॉडक्ट डिझाइन आणि मल्टी स्किल टेक्निशियन या कोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीच्या शेंद्रा व बिडकीन औद्योगिक पट्ट्यात गत दोन वर्षांत टोयोटा- किर्लोस्कर मोटार्स, जेएसडब्ल्यू, अथर एनर्जी या इलेट्रिक वाहन उद्योगांनी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला, तर गोदावरी न्यू पॉवर एनर्जी, सॅगो इंडिया, पिरॅमल फार्मा आणि अन्य कंपन्यांनी तेथे गुंतवणुकीची घोषणा केली. पुढील दोन ते तीन वर्षांत या कंपन्या प्रत्यक्षात उत्पादनात येणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुमारे एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल. या पार्श्वभूमीवर येथे येत असलेल्या कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळावे आणि मराठवाड्यातील तरुण, तरुणींना रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीने सहा महिन्यांपूर्वी शेंद्रा एमआयडीसीमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे. सर्व साेयी- सुविधांसह अत्याधुनिक असे हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे. तेथे २ ते ६ महिने कालावधीचे विविध १० प्रकारचे कोर्सेस सुरू केले आहेत.
विशेष म्हणजे या कोर्सेसकरिता प्रशिक्षणार्थीकडून एक रुपयाही शुल्क आकारले जात नाही. आठवी ते बारावी पास, पदविकाधारकांसाठी महत्त्वाचे हे कोर्सेस आहेत. गत सहा महिन्यांत सोलार पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन या कोर्सला विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दिली आहे. या कोर्सच्या तीन बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, तर एमआयडीसीमध्ये मागणी असलेल्या सीएनसी प्रोग्रामर आणि ईव्ही प्रॉडक्ट डिझाइन, या दोन्ही कोर्सला तरुणाईची दुसऱ्या क्रमांकाची पसंती असल्याचे दिसून येते. या दोन्ही कोर्सेसच्या प्रत्येकी दोन बॅचेसचे प्रशिक्षण सत्र पूर्ण झाल्याचे सेंटरचे प्राचार्य गिरिधर वाघमारे यांनी सांगितले.
कोर्सनंतर लगेच नोकरीची संधी
एमआयडीसीच्या कौशल्य विकास केंद्रातील विविध कोर्सेसचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र शासनाच्या व्होकेशनल इन्स्टिट्यूटचे प्रमाणपत्र मिळते. याआधारे प्रशिक्षणार्थींना लगेच नोकरी मिळते. एवढेच नव्हे, तर स्वत:चा स्टार्टअप उद्योगही सुरू करता येतो.
-गिरिधर वाघमारे, प्राचार्य
सर्व कोर्सेस मोफत
फूड प्रोसेसिंग अंतर्गत मल्टी स्किल टेक्निशिअन फ्रुट्स ॲण्ड व्हेजिटेबल्स, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित इलेक्ट्रिक व्हेइकल प्रॉडक्ट डिझाइन इंजिनिअर, इलेक्ट्रिक व्हेइकल मेंटेनन्स टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह कॅड टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह इंजिन रिपेअर टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह असेम्ब्ली टेक्निशयन, तसेच कॅपिटल गुड्सअंतर्गत सीएनसी ऑपरेटर, सिनिअर मॅन्युअल मेटल आर्क वेल्डर, शिल्डेड मेटल आर्क वेल्डर, मोबाइल डिव्हाइस मॅनेजमेंट ॲनालिस्ट आणि इंडस्ट्रिअल इलेक्ट्रिशियन आदी प्रकारचे कोर्स मोफत शिकविण्यात येतात.