मोबाइलवर टाका वाहनाचा फोटो; लगेच मिळते 'पीयूसी'; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:25 IST2026-05-12T16:23:11+5:302026-05-12T16:25:01+5:30
आरटीओ कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचे 'पीयूसी', ना तपासणी, ना कागदपत्रांची विचारणा

मोबाइलवर टाका वाहनाचा फोटो; लगेच मिळते 'पीयूसी'; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार
- संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : मोबाइलवर दुचाकी, चारचाकी वाहनांचे फोटो पाठवा आणि पीयूसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) प्रमाणपत्र घ्या, असा उद्याेग काहींनी सुरू केला आहे. ‘पीयूसी’ प्रमाणपत्र किती सहजपणे मिळते, याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे. आरटीओ कार्यालयाने कारवाईत जप्त करून ठेवलेल्या वाहनांचे केवळ फोटो मोबाइलवर पाठविल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पीयूसी प्रमाणपत्र तयार करून देण्यात आले. विशेष म्हणजे, यासाठी वाहनाची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली नाही, तसेच कोणत्याही कागदपत्रांची विचारणाही केली नाही.
प्रत्येक वाहनाला पीयूसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) प्रमाणपत्र बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र नसेल तर दंडात्मक कारवाईकाला वाहनधारकाला सामोरे जावे लागते. आरटीओच्या आवारात उभी असलेली काही वाहने अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. काही वाहनांची स्थितीही खराब आहे. तरीही त्यांना पीयूसी देण्यात आल्याने पर्यावरणीय नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असे केले ‘स्टिंग’
व्हाॅट्सॲपवर वाहनाचा फोटो टाकल्यानंतर सहजपणे ‘पीयूसी’ मिळत असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. असे दोन मोबाइल नंबर ‘लोकमत’ला मिळाले. या दोन्ही नंबरवर आरटीओ कार्यालयात उभ्या एका स्कूल व्हॅनचे आणि एका चारचाकी वाहनाचे फोटो पाठविण्यात आले. स्कूल व्हॅनचे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र अवघ्या १० मिनिटांत मिळाले. तर चारचाकी वाहनाचे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र हे ४० मिनिटांनी व्हाॅट्सॲपवर पाठविण्यात आले. या प्रमाणपत्रासाठी सांगितलेले शुल्कही ऑनलाइन पद्धतीने अदा करण्यात आले.
‘पीयूसी’ प्रमाणपत्र मिळण्याचे नियम काय?
- वाहनचालकाने वाहन प्रत्यक्ष अधिकृत पीयूसी केंद्रावर नेणे आवश्यक असते.
- केंद्रावर वाहनाच्या सायलेन्सरला प्रदूषण तपासणी यंत्र जोडले जाते.
- इंजिन सुरू करून वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरातील प्रदूषणाची पातळी तपासली जाते.
- पेट्रोल, डिझेल, सीएनजी अशा इंधन प्रकारांनुसार वेगवेगळे निकष लागू होतात.
- तपासणीनंतर संगणकीय प्रणालीमध्ये वाहन क्रमांक, इंजिन तपशील आणि प्रदूषणाची आकडेवारी नोंदवली जाते.
- सर्व निकष पूर्ण झाल्यासच पीयूसी प्रमाणपत्र जारी केले जाते. प्रमाणपत्रावर तपासणीची तारीख, वैधता कालावधी आणि उत्सर्जनाचे मोजमाप नमूद केलेले असते.
काय धोका?
- प्रत्यक्ष तपासणी न करता दिले जाणारे पीयूसी प्रमाणपत्र म्हणजे प्रदूषण नियंत्रण यंत्रणेलाच फसविण्याचा प्रकार ठरतो.
- धूर जास्त सोडणारी वाहने रस्त्यावर फिरल्याने वायुप्रदूषण वाढू शकते.
- दमा, ॲलर्जी, श्वसनविकार आणि हृदयविकारांच्या रुग्णांना याचा मोठा फटका बसतो.
- जुनी आणि खराब स्थितीतील वाहने ‘फिट’ दाखविल्याने पर्यावरणीय नियमांचा उद्देशच फोल ठरतो.
- अशा गैरप्रकारांमुळे अधिकृत पीयूसी प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास उडून जातो.
- अपघात किंवा तपासणीवेळी बनावट पीयूसी आढळल्यास वाहनचालकांनाही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
- शासनाची प्रदूषण नियंत्रण मोहीमच यामुळे निष्प्रभ ठरते.
कारवाई होईल...
वाहनाची तपासणी करूनच ‘पीयूसी’ प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. विनातपासणी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र दिले जात असेल तर कारवाई केली जाईल. यापूर्वीही अशी कारवाई केलेली आहे.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी