तुम्ही खाताय ते 'चीज' अस्सल की कृत्रिम? आता मेनुकार्डवर द्यावी लागणार माहिती; FDA चा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:03 IST2026-04-20T17:02:44+5:302026-04-20T17:03:35+5:30
‘चीज ॲनालॉग’बाबत ग्राहकांना सांगावेच लागणार, ग्राहकांची फसवणूक टळणार, एफडीएचा केटरर्सना सज्जड दम

तुम्ही खाताय ते 'चीज' अस्सल की कृत्रिम? आता मेनुकार्डवर द्यावी लागणार माहिती; FDA चा इशारा
छत्रपती संभाजीनगर : खाद्यपदार्थांमध्ये ‘चीज ॲनालॉग’ (कृत्रिम चीज) आणि बनावट पनीरच्या वाढत्या वापराबाबत अन्न व औषधी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. शहरातील केटरिंग व्यावसायिकांची शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पदार्थात कृत्रिम चीज किंवा पनीर वापरले असेल, तर त्याचा मेन्यूकार्डवर स्पष्ट उल्लेख करणे आणि ऑर्डर घेताना ग्राहकाला कल्पना देणे बंधनकारक आहे, असे कडक निर्देश देण्यात आले.
सहायक आयुक्तांच्या(अन्न) मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये यासाठी प्रशासनाने अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ मधील तरतुदींची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.
-व्यावसायिकांसाठी हे नियम
-चीज, पनीर किंवा इतर कच्चे अन्नपदार्थ केवळ अधिकृत परवानाधारक पुरवठादारांकडूनच खरेदी करावेत आणि त्याचे पक्के बिल जवळ ठेवावे.
-मेन्यूकार्डवर चीज की चीज ॲनालॉग वापरले आहे, याचा ठळक उल्लेख असावा.
-अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री करून त्याचा विश्लेषण अहवाल सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
-स्वयंपाकाची जागा स्वच्छ असावी. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डोक्यावर टोपी, ॲप्रन आणि ग्लोव्हज् वापरावेत. स्टीलचीच भांडी वापरावीत.
कारवाईचा इशारा
अनेकदा खर्च वाचवण्यासाठी अस्सल चीजऐवजी स्वस्त चीज ॲनालॉग वापरले जाते. ही बाब गांभीर्याने घेत सहायक आयुक्त विवेक पाटील यांनी इशारा दिला की, शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग युनिट्सची अचानक तपासणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होईल. या बैठकीला अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, केटरिंग असोसिएशनचे पदाधिकारी आणि शहरातील मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित होते. अन्न हाताळणीबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
काय आहे ‘चीज ॲनालॉग’?
चीज ॲनालॉग हे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांऐवजी वनस्पती तेल आणि इतर रसायनांपासून बनवले जाते. दिसायला हे हुबेहूब चीजसारखेच असते; पण त्याची चव आणि गुणधर्म अस्सल दुग्धजन्य चीजपेक्षा वेगळे असतात. केवळ स्वस्त मिळते म्हणून याचा वापर वाढला आहे.