ॲपवर नफ्याचे आकडे, पण पैसे मिळेना; शेअर मार्केटच्या नावाने निवृत्त प्राचार्याला ३१ लाखांचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 19:41 IST2026-04-23T19:40:30+5:302026-04-23T19:41:08+5:30
सायबर गुन्हेगारांनी ॲपद्वारे कसा घातला गंडा? वाचा निवृत्त प्राचार्यांची आपबिती.

ॲपवर नफ्याचे आकडे, पण पैसे मिळेना; शेअर मार्केटच्या नावाने निवृत्त प्राचार्याला ३१ लाखांचा चुना
छत्रपती संभाजीनगर : गुंतवणुकीसंदर्भात बनावट अॅप इन्स्टॉल करण्यास सांगून सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त प्राचार्याला तब्बल ३१ लाख ७ हजारांचा गंडा घातला. २१ एप्रिल रोजी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
६९ वर्षीय तक्रारदार सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना व्हॉट्स अॅपवर दोन अज्ञात क्रमांकावरून गुंतवणुकीबाबत माहिती देणारी सुंदरम मार्केट मास्टर्स वेबसाईटची लिंक प्राप्त झाली. त्यावर क्लिक करताच तक्रारदाराला दाेन व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यात प्रत्येकजण त्यांचा सदर कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर कसा फायदा झाला, असे सांगत होता. त्याच दरम्यान तक्रारदाराला कायरा शर्मा नामक महिलेने संपर्क केला. गुंतवणूक केल्यास २० ते ३० टक्के परताव्याचे आमिष दाखवले. त्यासाठी मोबाइलमध्ये ‘एसडीएएमसी’ व ‘एसडीएएमसीएचडी’ हे दोन अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले.
५ हजारांपासून केली सुरुवात...
तक्रारदाराने सुरुवातीला सदर दोन्ही अॅपमध्ये ५ हजारांची गुंतवणूक केली. तीन महिन्यांमध्ये तक्रारदाराने एकूण ३१ लाख ७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. तक्रारदाराने सर्व पैसे सुंदरम ट्रेडिंग नावाच्या बँक खात्यावर ऑनलाइन पाठवले.
अॅपवर नफा दिसत होता मात्र ‘आभासी’
तक्रारदार पैसे पाठवत होता. तसे त्यांनी इन्स्टॉल केलेल्या अॅपमध्ये त्यांच्या गुंतवणुकीवर २० ते ३० टक्के परतावा मिळत असल्याचे दिसत होते. हे सर्व पैसे आपण काढून घेऊ शकतो, असे तक्रारदाराला वाटत राहिले. तीन महिन्यांनंतर त्यांनी नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांनी कायरा शर्माला याबाबत विचारताच त्यांना ब्लॉक करण्यात आले आणि त्यानंतर अॅप, त्यावर दिसणारे नफ्याचे आकडे दोन्ही बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय, व्हॉट्सअॅप ग्रुपवर नफा मिळाल्याचे मेसेज करणारे क्रमांकही त्यांच्याच टोळीचा भाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत अधिक तपास करत आहेत.