विशेष पथकातील पोलीस लाच घेताना पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2015 23:55 IST2015-12-22T23:43:05+5:302015-12-22T23:55:02+5:30

बीड : दरमहा १० हजार रूपयांप्रमाणे ३० हजार रूपये हप्ता दिला नाही तर प्रत्येक रेडमध्ये आरोपी करीन, अशी धमकी देऊन तीन मटकाचालकांकडून

Police in the special squad caught while taking a bribe | विशेष पथकातील पोलीस लाच घेताना पकडला

विशेष पथकातील पोलीस लाच घेताना पकडला

बीड : दरमहा १० हजार रूपयांप्रमाणे ३० हजार रूपये हप्ता दिला नाही तर प्रत्येक रेडमध्ये आरोपी करीन, अशी धमकी देऊन तीन मटकाचालकांकडून पैसे घेऊन आलेल्या एका व्यक्तीकडून ते स्वीकारताना उपविभागीय अधिकारी यांच्या पथकप्रमुखास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दुपारी पकडले.
मुरली नायबा गंगावणे असे त्या लाच घेताना पकडलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो सध्या उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांच्या विशेष पथकाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. १७ डिसेंबर रोजी धानोरा रोड येथे उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने मटका अड्ड्यावर धाड टाकून दीपक खोड यास पकडले. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात नोंद केली. विशेष पथकातील गंगावणेच्या सांगण्यावरून तक्रारदार यांचे नाव आरोपी म्हणून घातले. त्याबाबत गंगावणेने तक्रारदार बाळू जिजाबा मस्के यांच्याकडे निरोप दिला की, नितीन खोड, बाळासाहेब जाधव व सुरेश जटावाले यांनी मला दरमहा १० हजार रूपयांप्रमाणे ३० हजार रूपये हप्ता द्यावा. अन्यथा मी नितीन खोड यांना आरोपी केल्याप्रमाणे जाधव व जटावाले यांनाही अशा प्रकारे केस दाखवून प्रत्येक धाडीमध्ये आरोपी करीन, असे सांगितले.
सदरच्या तक्रारीवरून मंगळवारी बार्शी रोडवरील एका हॉस्पिटलजवळ पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, तक्रारदार बाळू मस्के यांच्याकडे ३० हजार रूपये देण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी माने कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचला असता मुरली गंगावणे यास बाळू मस्के यांच्याकडून ३० हजार रूपये लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडले.
गंगावणेविरूद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अरूण देवकर, पो. नि. गोंदकर, गजानन वाघ, पो.हे.काँ. श्रीराम खटावकर, दादासाहेब केदार, अशोक ठोकळ यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Police in the special squad caught while taking a bribe