ऑपरेशन नारेगाव: पहाटे ४ चे नियोजन, मनपाचा उशीर आणि मतीन पटेलच्या अवैध साम्राज्यावर हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 16:55 IST2026-05-14T16:55:09+5:302026-05-14T16:55:09+5:30
खंडपीठाने स्थगिती नाकारताच मनपा-पोलिसांची मध्यरात्री रणनीती; पोलिसांचे पहाटेचे नियोजन हुकले; तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर कारवाई; गुप्तचर यंत्रणेकडून सातत्याने इनपुट, २५६ पोलिसांचा फौजफाटा; नारेगावमध्ये तणाव नियंत्रणात

ऑपरेशन नारेगाव: पहाटे ४ चे नियोजन, मनपाचा उशीर आणि मतीन पटेलच्या अवैध साम्राज्यावर हातोडा
छत्रपती संभाजीनगर : टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण व बळजबरीने धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन खानच्या नारेगावमधील अवैध मालमत्ता बुधवारी उद्ध्वस्त करण्यात आल्या. मंगळवारी रात्री ९ वाजता मनपा व पोलिस अधिकाऱ्यांच्या दोन तासांच्या उच्चस्तरीय बैठकीत यासाठी नियोजन आखण्यात आले होते. काही समाजकंटकांच्या सहभागाबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह गुप्तचर खात्याकडून सातत्याने माहिती गोळा केल्यानंतर बुधवारी सकाळी ही मोहीम फत्ते करण्यात आली.
मतीनच्या अटकेनंतर मनपाने त्याच्या अनधिकृत घराचे बांधकाम, कार्यालयावर कारवाई करण्याचे नियोजन आखले होते. नोटीस बजावल्यानंतरच मनपाचे धोरण स्पष्ट झाले होते. मतीनने या कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर मनपाने कारवाईसाठी नियोजन आखले. या कारवाईचा सुगावा लागल्याने एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे त्यांचे ३४ नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसह नारेगावमध्ये आल्याने मध्यरात्री २ वाजेपर्यंत तणाव होता. मात्र, पोलिसांनी योग्य संवाद साधत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
शहरात परतताच उच्चस्तरीय बैठक
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता खंडपीठाने मनपाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. तेव्हा मनपा आयुक्त अमोल येडगे कार्यालयीन कामानिमित्त मुंबईत होते. रात्री ९ वाजता येडगे विमानाने शहरात येताच मनपा, पोलिस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. यात बंदोबस्त व अन्य कारवाईचे नियोजन आखण्यात आले.
अंधारातच पाडापाडीचे होते नियोजन
- पाडापाडीदरम्यान तणाव निर्माण होण्याची शक्यता हाेती. ते टाळण्यासाठी पोलिसांनी मनपाला पहाटे ४ वाजताच मोहीम फत्ते करण्याची सूचना केली होती.
-त्यानुसार नियोजन आखण्यात आले. रात्री ११ वाजता पोलिस अधिकाऱ्यांनी बंदोबस्तासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलिस निरीक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश जारी केले.
-४ वाजता पोलिस आले. मात्र, मनपा पथक सकाळी ६ वाजता दाखल झाल्याने अंधारात कारवाई फत्ते करण्याचा पोलिसांचा उद्देश असफल राहिला. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
तणाव टाळण्यासाठी गोपनीय माहितीवर भर
कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेता गुप्तचर खात्यासह पोलिसांची विशेष शाखा, स्थानिक ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साध्या वेशात गोपनीय माहिती गोळा करणे सुरू होते. गल्लीबोळात जाऊन गुप्त बातमीदारांकडून अंदाज घेण्यात येत होते. पहाटे ३:३० वाजेपर्यंत याबाबत वरिष्ठांना माहिती देणे सुरू होते. यामुळे रात्रभर वरिष्ठ पोलिस अधिकारी डोळ्यात तेल घालून कारवाईवर लक्ष ठेवून होते.
२५६ पाेलिस तैनात
प्रभारी पोलिस आयुक्तांसह, १ उपायुक्त, २ सहायक पोलिस आयुक्तांसह १० पोलिस निरीक्षक, १५ पुरुष तर ८ महिला सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक, १२० पुरुष तर ६० महिला अंमलदार, दंगा काबू पथकाचे सशस्त्र १२० जवान, शीघ्र कृती दलाचे ३० जवान सकाळपर्यंत तैनात हाेते. नारेगावमध्ये आणखी काही दिवस २४ तास दोन पोलिस अधिकारी, दहा अंमलदार, दंगा काबू पथक व एसआरपीएफचे जवान तैनात असतील.