छत्रपती संभाजीनगरात मनपात मोठी कारवाई; सुखना नदीपात्रातील ८५ अतिक्रमणे जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:33 IST2026-04-27T16:31:56+5:302026-04-27T16:33:07+5:30

नदीपात्रात पेव फुटलेल्या अतिक्रमणांचा मनपाकडून सफाया! चिकलठाण्यात रस्ते अन् नदी मोकळी

Massive Demolition Drive in Chhatrapati Sambhajinagar: 85 Encroachments Removed from Sukhana Riverbed | छत्रपती संभाजीनगरात मनपात मोठी कारवाई; सुखना नदीपात्रातील ८५ अतिक्रमणे जमीनदोस्त

छत्रपती संभाजीनगरात मनपात मोठी कारवाई; सुखना नदीपात्रातील ८५ अतिक्रमणे जमीनदोस्त

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथे मिनी घाटीच्या पाठीमागे सुखना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कच्ची, पक्की अतिक्रमणे होती. गत आठ ते दहा वर्षांमध्ये या भागात अतिक्रमणांचे अक्षरश: पेव फुटले होते. नदीपात्रात धोक्याची आणि कमी धोक्याची लक्ष्मण रेखा नगररचना विभागाने आखून दिल्यावर शनिवारी मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने तब्बल ८५ अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविला. ३० पेक्षा अधिक अतिक्रमणांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली. त्यांनी स्वत:हून अतिक्रमण न काढल्यास सोमवारी मनपा परत कारवाई करणार आहे.

खाम नदीपात्राला ज्या पद्धतीने गतवैभव मिळवून देण्यात मनपाला यश आले, त्याच धर्तीवर सुखना नदीचा कायापालट करणे सुरू झाले आहे. नदीपात्राला दोन्ही बाजूने दगडी पिचिंग मागील काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. चार वर्षांपूर्वी सुखना नदीला पूर आला होता, आसपासच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. मिनी घाटीच्या पाठीमागील स्मशानभूमीचेही मोठे नुकसान झाले होते. पात्रात नागरिकांनी घरे, दुकाने बांधली होती. या ठिकाणी विविध व्यवसाय, खासगी दवाखाने, औषधीची दुकाने, कार्यालये थाटण्यात आली होती. मनपाच्या नगररचना विभागाने पात्रात धोकादायक आणि कमी धोकादायक रेषा आखून दिली. त्यात ११० अतिक्रमणे असल्याचे निदर्शनास आले होते. पाच दिवसांपूर्वी मनपाच्या पथकाने या ठिकाणी भोंगा लावून नागरिकांनी स्वत: अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन केले. काही नागरिकांनी सामान काढून घेतले. त्यानंतर मनपाच्या जेसीबीने कच्ची पक्की, अतिक्रमणे दिवसभरात जमीनदोस्त करण्यात आली. चौधरी कॉलनीच्या शेवटच्या टोकापर्यंत हे पात्र मोकळे करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले. ही कारवाई निवृत्त सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक प्राप्ती जाधव, गणेश वीर, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, संदीप काकनाटे, जेसीबी वाहनचालक दराडे यांनी केली.

मोतीवाला कॉलनीत अडसर
मोतीवाला कॉलनीत २८ ते ३० कच्ची घरे, दुकाने आहेत. या भागातील नागरिकांनी दोन दिवसांचा वेळ मागितला. त्यांना वेळ देण्यात आला. सोमवारी परत या ठिकाणी कारवाई होणार आहे. पात्रातील एकही अतिक्रमण शिल्लक ठेवले जाणार नसल्याचे वाहळू यांनी सांगितले.

चायना भिंतही पाडली
मिनी घाटीच्या पाठीमागे नदीपात्रात एका व्यक्तीने १०० फुटांपेक्षाही मोठी भिंत उभारली होती. पात्रातील बहुतांश जागा हडपण्याचा हा डाव होता. रेड लाईनमध्ये भिंत येत असल्याने तीसुद्धा जमीनदोस्त करण्यात आली.

Web Title : छत्रपति संभाजीनगर में अतिक्रमण पर बड़ी कार्रवाई: 85 ढांचे ध्वस्त

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में मिनी घाटी के पास सुखना नदी के किनारे 85 अवैध निर्माणों को तोड़ा गया। पिछले दस वर्षों में यहाँ अतिक्रमण तेजी से बढ़ा था। कुछ मालिकों को दो दिन का नोटिस दिया गया। इस कार्रवाई का उद्देश्य नदी को पुनर्जीवित करना है, जैसा कि खाम नदी परियोजना में किया गया था।

Web Title : Massive Encroachment Drive: 85 Structures Razed in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar authorities demolished 85 encroachments on the Sukhna riverbed near Mini Ghati. Many illegal structures had mushroomed over the last decade. Some owners received two-day notices. This action aims to restore the river's glory, mirroring the Kham River project, after past flooding caused significant damage.