चोरांची ‘झारखंड गँग’ पुन्हा सक्रिय, छ. संभाजीनगरात अवघ्या अर्ध्या तासात चोरले डझनभर मोबाइल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:28 IST2026-04-21T14:27:06+5:302026-04-21T14:28:34+5:30
शिर्डीत मुक्काम करून आसपासच्या शहरांत साधतात डाव; शेतकऱ्यांनीच चोरांना पकडून धुलाई करत पोलिसांच्या हवाली केले.

चोरांची ‘झारखंड गँग’ पुन्हा सक्रिय, छ. संभाजीनगरात अवघ्या अर्ध्या तासात चोरले डझनभर मोबाइल
छत्रपती संभाजीनगर : मोबाइल चोरांची 'झारखंड गँग' पुन्हा शहरात सक्रिय झाली असून, जाधववाडीत सकाळच्या सत्रात अवघ्या अर्ध्या तासात १२ पेक्षा अधिक मोबाइल चोरुन हैदोस घातला. रविवारी सकाळी ८:१५ ते ८:४५ दरम्यान एकाच वेळी अनेकांचे मोबाइल चोरीला गेल्याने बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला होता.
कोलठाणचे शेतकरी प्रभाकर आहेर (५२) हे नियमित जाधववाडीत भाजी खरेदीसाठी येतात. १९ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजता ते भाजीपाला खरेदीसाठी आले होते. पंधरा मिनिटांनी त्यांना त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्याच वेळी अन्य जागेवरून मोबाइल चोरीला गेल्याने आरडाओरड सुरू झाली. त्यांनी मित्रासह चोरांचा शोध सुरू केला. संशयास्पद तरुण दिसताच पकडून विचारपूस केल्यावर त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. उत्तर देताना भंबेरी उडाल्याने त्यांना थेट सिडको पोलिस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीत त्यांची राेहनकुमार बिलोप्रसाद चौरसिया (२०), अनिल मंडू नोनिया (२०, दोघे रा. साहेबगंज, झारखंड), अशी नावे असल्याचे समोर आले, तर त्यांचा तिसरा साथीदार पळून गेला. रोहनकुमार, अनिलवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
१२ पेक्षा अधिक मोबाइल लंपास
आहेर यांच्यासह ज्ञानेश्वर सोनवणे, संजय वाघ, राजेश दंडनाईक, विष्णू अंभोरे, संजय वरकड, संदीप हरणे, धनसिंग म्हस्के, ज्ञानेश्वर सुरासे, नारायण आधापुरे, नूर मोहम्मद नबी शेख, सुरेश जाधव आदींसह १२ पेक्षा अधिक मोबाइल जाधववाडीतून चोरीला गेले.
सहा महिन्यांपूर्वी टोळी पकडली
जाधववाडीत सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे झारखंड, बिहारहून मोबाइल चोरण्यासाठी आलेल्या टोळीचे साथीदार रंगेहाथ पकडून शेतकरी, व्यापाऱ्यांनी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यात काही अल्पवयीन मुलांचादेखील सहभाग होता. त्यांच्या म्होरक्याचा शोध मात्र लागू शकला नाही. विशेष म्हणजे, जाधववाडीत सातत्याने लुटमार, चोरीच्या घटना घडत आहेत.
शिर्डीत मुक्काम, म्होरक्यांवर टेहळणीची जबाबदारी
रविवारी पकडलेल्या दोघांपैकी एकाकडे चोरीचा केवळ एक मोबाइल मिळाला. अन्य मोबाइल टेहळणी करणाऱ्यांकडे होते. मोबाइल चोरून तत्काळ म्होरक्यांकडे सुपुर्द करून पुन्हा दुसरे सावज शोधण्याची त्यांना सूचना असते. ही टोळी काही दिवसांपासून शिर्डीत मुक्कामी होती. शिर्डीत स्वस्त दरात राहणे होते. त्यामुळे तेथे राहून आसपासच्या शहर, जिल्ह्यातील बाजारपेठेत जाऊन हे चोरी करतात. विशेष म्हणजे, बाजारपेठा अधिक असलेल्या जिल्ह्यांत मुक्कामाचा कालावधी ठरवतात. दोन ते तीन दिवस चोरी करून ते तत्काळ शहर सोडतात. महिना, दोन महिन्यांनी पुन्हा त्या शहरात जातात, असे चाैकशीत समोर आले आहे.