काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ महिन्यांच्या बाळासह १५ जणांना उष्माघाताचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:50 IST2026-04-30T16:48:24+5:302026-04-30T16:50:01+5:30
१२ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार, आरोग्य विभागाकडून हाय अलर्ट जारी.

काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ महिन्यांच्या बाळासह १५ जणांना उष्माघाताचा फटका
छत्रपती संभाजीनगर : तापमानाचा पारा ४३ अंशावर गेल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत दोन दिवसांत सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या उष्माघाताच्या १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर ग्रामीण रुग्णालयामध्ये ६ महिन्यांच्या बाळासह तिघांना उष्माघाताची लक्षणे आढळून आल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतली आहे.
देवगाव रंगारी येथील ६ महिन्यांच्या मुलीची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी बुधवारी दुपारी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी औषधोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला घाटीत रेफर करण्यात आले; परंतु सदर मुलगी घाटीत दाखल झालेली नाही, अशी माहिती घाटीतील डाॅक्टरांनी दिली. गेल्या आठवडाभरात पाचोड येथील दोघांना उष्माघाताची लक्षणे आढळली. त्यांच्यावर पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोघांनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली, तर २७ व २८ एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांत सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या उष्माघाताच्या १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
खाजगी रुग्णालयांतही रुग्ण
उष्माघात, डोकेदुखी, अशक्तपणा, उलट्या, जुलाब यासारख्या तक्रारी घेऊन खाजगी रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ‘ऊन लागले’, ‘उन्हाळी लागली’ असे रुग्णांकडून डाॅक्टरांना सांगितले जाते.
ही घ्या काळजी
- दुपारी १२ ते ४ दरम्यान शक्यतो बाहेर पडणे टाळावे.
- भरपूर पाणी, ताक, लिंबूपाणी, फळांचा रस घ्यावा.
- डोक्यावर टोपी, रुमाल वापरावा.
- हलके व सैल कपडे परिधान करावेत.
सर्व सौम्य उष्माघाताचे रुग्ण
ग्रामीण रुग्णालयातील तिन्ही रुग्ण हे सौम्य उष्माघाताचे आहेत. घाटीत रेफर करण्यात आलेल्या मुलीला कुटुंबीयांनी घरी नेले. आम्ही तिच्या फाॅलोअपमध्ये आहोत. तिची प्रकृती चांगली आहे.
- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक
सर्व रुग्णांना सुटी
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार केलेल्या सर्व १२ रुग्णांना सुटी देण्यात आली. हे सर्व सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या उष्माघाताचे रुग्ण होते.
- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
तालुका हाय उष्माघातसदृश रुग्ण
तालुका- रुग्णसंख्या
कन्नड-१
पैठण- ४
फुलंब्री-३
वैजापूर-२
खुलताबाद-१
सिल्लोड-२
गंगापूर-१
छत्रपती संभाजीनगर-१