पालकमंत्री शिरसाटांनी अडवले अन् खासदार कल्याण काळे भडकले; DPDC बैठकीत खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 18:43 IST2026-05-15T18:41:42+5:302026-05-15T18:43:14+5:30
"मी संविधानिक अधिकाराने बसलोय!"; छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीत नेत्यांची जुंपली

पालकमंत्री शिरसाटांनी अडवले अन् खासदार कल्याण काळे भडकले; DPDC बैठकीत खडाजंगी
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार कल्याण काळे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. जिल्ह्यातील शेती आणि पिकांच्या नुकसानीचा मुद्दा मांडत असताना पालकमंत्र्यांनी वेळ मर्यादेवरून अडवल्याने खासदार काळे चांगलेच संतापले.
वादाचे नेमके कारण काय?
बैठकीत खासदार कल्याण काळे मागील वर्षीच्या कापूस, मका आणि खरीप पिकांच्या कमी उत्पादनावर भाष्य करत होते. मात्र, एकाच विषयावर दीर्घकाळ चर्चा होत असल्याने संजय शिरसाट यांनी आक्षेप घेतला. "एक आमदार किंवा खासदार दोन-दोन तास बोलत असेल, तर या बैठकीचा अर्थ काय? मी हे ऐकून घेणार नाही," अशा शब्दांत शिरसाटांनी आपला संताप व्यक्त केला.
काळेंचे जोरदार प्रत्युत्तर
शिरसाटांच्या भूमिकेवर खासदार कल्याण काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "या बैठकीत येण्याचा मला संविधानिक अधिकार आहे. कोणाला बसू द्यायचे आणि कोणाला नाही, हे तुम्ही ठरवून कसे चालेल?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वादामुळे बैठकीतील वातावरण काही काळासाठी अत्यंत तणावपूर्ण बनले होते. पालकमंत्री शिरसाट यांनी खरीपाची बैठक घाईत आटोपून घेतली. २४०० रुपये क्विंटलने मकाला हमीभाव आहे. मात्र, व्यापारी बाराशे रुपयाने घेत आहेत. हाच प्रश्न मला मांडत असताना पळकमंत्र्यांनी बोलू दिले नाही. केंद्राने आणि राज्याने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
शेवटी वादावर पडदा
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी नरमाईची भूमिका घेतली. "एखादा विषय किती ताणावा, याला मर्यादा असतात. काळे आणि माझं वैयक्तिक वैर नाही, ते माझे मित्र आहेत. आमच्यातील वाद आता संपला आहे," असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.