छत्रपती संभाजीनगरमध्ये 'गेल इंडिया'चा १०० मेगावॅटचा सौर प्रकल्प; ३,८०० कोटींची मोठी गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:48 IST2026-04-18T19:48:03+5:302026-04-18T19:48:30+5:30
ऑरिक सिटीला मिळणार अखंड 'हरित ऊर्जा'! गेल इंडिया उभारणार बॅटरी स्टोरेजसह हायटेक सोलर प्लांट

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'गेल इंडिया'चा १०० मेगावॅटचा सौर प्रकल्प; ३,८०० कोटींची मोठी गुंतवणूक
छत्रपती संभाजीनगर : येथील दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या बिडकीन आणि शेंद्रा औद्योगिक झोनमध्ये मागील अडीच वर्षांपासून सुमारे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या विविध कंपन्या प्रकल्प साकारत आहेत. यातील बहुतेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आहेत. या पार्श्वभूमीवर येथील वाढत्या विजेची मागणी लक्षात घेत केंद्र सरकारची कंपनी असलेल्या गॅस अथाॅरिटी ऑफ इंडिया (गेल) कंपनीने छत्रपती संभाजीनगरात १०० मेगावॅट क्षमतेचा सोलार वीज प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.
डीएमआयसीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील उपलब्ध औद्योगिक भूखंडांपैकी ९५ टक्के भूखंड वाटप झाले आहे. येथे टोयोटा-किर्लोस्कर मोटार्स, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी, एथर एनर्जी अशा ईव्ही उद्योगांनी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.या कंपन्यांचे बांधकाम सध्या सुरू झाले आहेत. एवढेच नव्हे तर या कंपन्यांच्या पुरवठादार, व्हेंडर असलेल्या अनेक कंपन्यांकडून डीएमआयसीमध्ये भूखंड घेतले आहेत. शिवाय आणखी विविध उद्योगांकडून अडीच हजार एकर जमिनीची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामुळे शासनाने ऑरिकसाठी आणखी ८ हजार एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या गेल इंडिया प्रा. लिमिटेडने छत्रपती संभाजीनगरमध्ये १०० मेगावॅट क्षमतेचा सोलार वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. याबाबतचे ट्विट कंपनीच्या एक्स या समाजमाध्यमावर नुकतेच करण्यात आले आहे. या ट्विटनुसार कंपनीकडून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात ७०० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनी दोन्ही राज्यांत सुमारे ३ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. २२ एमडब्ल्यूएच क्षमतेची बीईएसएस प्रणालीचा हा प्रकल्प असेल. या प्रकल्पात सौरऊर्जेतील अस्थिरता कमी करण्यासाठी बॅटरी स्टोरेज प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. परिणामी, २४ तास अखंड हरित ऊर्जा उपलब्ध होणार आहे.
विजेचा तुटवडा कमी होईल
गेल इंडियासारखी मोठी कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे, ही एक अभिमानाची बाब आहे. या प्रकल्पामुळे उद्योगांना विजेच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार नाही. शिवाय स्वस्त आणि स्वच्छ वीज उपलब्ध होईल. स्थानिक निर्यातदारांना व्यवसायवृद्धीसाठी याचा लाभ होईल.
-उत्सव माछर, अध्यक्ष सीएमआयए.