समृद्धी महामार्गावर पहिल्यांदाच 'चक्काजाम'! कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी उद्धवसेनेचे आंदोलन; पोलिसांच्या गाड्यांवर फेकले कांदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:55 IST2026-05-18T13:54:25+5:302026-05-18T13:55:29+5:30
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वैजापुरात उद्धवसेना भडकली! जांबरगाव इंटरचेंज रोखल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर पहिल्यांदाच 'चक्काजाम'! कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी उद्धवसेनेचे आंदोलन; पोलिसांच्या गाड्यांवर फेकले कांदे
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांच्या न्यायासाठी उद्धवसेना आक्रमक झाली असून सोमवारी समृद्धी महामार्गावर जांबरगाव (ता. वैजापुर) येथील इंटरचेंज येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत महामार्ग रोखला. समृद्धी महामार्ग रोखून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रथमच चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शेतकऱ्यांना न्याय द्या, कांद्याला हमीभाव द्या, उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, अशा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी. दोन्ही बाजूंनी टायर जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिक आणखी संतप्त झाले. पोलिसांची गाडी अडवून “शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असताना नेत्यांना ताब्यात का घेता?” असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला. आंदोलक शिवसैनिकांनी पोलिसांच्या वाहनावर कांदे फेकून संताप व्यक्त केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेतल्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या
नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याला किमान ₹२,००० प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, प्रतिक्विंटल ₹१,५०० अनुदान जाहीर करावे, कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवावी, खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, कांदा चाळ उभारणीसाठी ७५ टक्के अनुदान द्यावे आणि दर्जेदार कांदा बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागण्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या.