पैठणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; आठजणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:10 IST2025-05-29T20:09:56+5:302025-05-29T20:10:18+5:30

याप्रकरणी आठजणांविरोधात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

Fatal attack on social worker in Paithan; Case registered against eight people | पैठणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; आठजणांविरोधात गुन्हा दाखल

पैठणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; आठजणांविरोधात गुन्हा दाखल

पैठण : शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यावर फायबरचा दांडा, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता सुमारास शहरातील झुंजे हाऊस परिसरात घडली. या घटनेचे कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे. याप्रकरणी आठजणांविरोधात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

आतिश गायकवाड (वय ३९, रा. साई कॉलनी, पैठण) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, गायकवाड हे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून घरी जात होते. झुंजे हाऊस परिसरात आल्यानंतर तीन दुचाकीवर आलेल्या अनोळखी आठजणांनी संगनमत करून त्यांच्यावर फायबरचा दांडा, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. दरम्यान, गायकवाड यांच्यावर पैठण येथे रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी रुग्णालयात येऊन गायकवाड यांचा जबाब नोंदविला. त्यावरून आठ अज्ञात लोकांविरोधात पैठण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

..नसता पैठण बंदचा इशारा
या घटनेचा निषेध नोंदवून या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावे, नसता रविवारी पैठण शहर बंद करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Web Title: Fatal attack on social worker in Paithan; Case registered against eight people