निवडणुकीसाठी अपत्य लपवण्याचा 'पॅटर्न' उघड! मेहराज खान प्रकरणाने खळबळ; आता संशयित उमेदवारांची कागदपत्रेही रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 16:38 IST2026-05-14T16:36:31+5:302026-05-14T16:38:47+5:30

बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे शोधणार, डीएनए चाचणी देखील होणार; नगरसेवक मेहराज खानसह मुख्याध्यापक १७ मेपर्यंत पोलिस कोठडीत

Fake bonafide case reveals big racket; Documents of other suspected candidates also on radar in Mehraj case | निवडणुकीसाठी अपत्य लपवण्याचा 'पॅटर्न' उघड! मेहराज खान प्रकरणाने खळबळ; आता संशयित उमेदवारांची कागदपत्रेही रडारवर

निवडणुकीसाठी अपत्य लपवण्याचा 'पॅटर्न' उघड! मेहराज खान प्रकरणाने खळबळ; आता संशयित उमेदवारांची कागदपत्रेही रडारवर

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल करत आपले ‘तिसरे अपत्य’ लपवल्याप्रकरणी मंगळवारी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात अटक झालेल्या मेहराजसह बनावट प्रमाणपत्र देणारा शाळेचा मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी यांनी मिळून हे बोगस प्रमाणपत्र तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाला आणखी असे प्रमाणपत्र सादर झाले का? याचा पोलिस आता शोध घेणार असल्याचे पाेलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जुना बाजार परिसरात २६ मार्च रोजी राजकीय वादातून मालेगावच्या इस्लाम पार्टीचे नेते रफत यार खान (४५, रा. मिल कॉर्नर) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यात नगरसेवक मेहराज खानचा भाऊ मिनाज खान अब्दुल जलील खान (४०, रा. सिटी चौक) याच्यासह ११ जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मेहराजने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात दोन अपत्ये असल्याचा उल्लेख केला आहे. तर गुन्ह्याच्या तपासात समोर आलेला विधीसंघर्षग्रस्त बालक मिनाज खान यांचे अपत्य असल्याचे दाखविण्यात आले होते. सदर हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे करत आहेत. शिंदे यांनी विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या वयाची खात्री करण्यासाठी शाळेला पत्रव्यवहार केला. मात्र, शाळेने ते देण्यास विलंब केला.

शाळेने दिलेल्या बोनाफाइड प्रमाणपत्रात तो मिनाज खान यांचा मुलगा असल्याचे दाखवले. संशय बळावल्याने पोलिसांनी त्याचा प्रवेश निर्गम उतारा देण्याची सूचना केली. त्यावरून मात्र सदर बालक मेहराज यांचे असल्याचे निष्पन्न झाले.

अन्य आरोपी घर सोडून पसार
‘लोकमत’ने २५ एप्रिल रोजी मेहराजच्या या घोटाळ्याविषयी सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले हाेते. त्यानंतर मंगळवारी यात नगरसेवक मेहराज खान जलील खान, त्याची पत्नी निलोफर, भाऊ मिनाज खान जलील खान, भावजय इकरा मिनाज खान, मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी, मित्र सज्जू उस्तादसह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच मेहराज, शाळेचा मुख्याध्यापक इलियासला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्याची कुणकुण लागताच अन्य आरोपी मंगळवारी घर सोडून पसार झाले.

एमआयएमला दुसरा दणका; मेहराजही तुरूंगात
एकीकडे नाशिक टीसीएसने लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणात नगरसेवक मतीन खानवर गुन्हा दाखल केला. सध्या तो पसार झाला आहे तर नगरसेवक मेहराजला अटक करण्यात आली. एमआयएमचे दाेन नगरसेवक एकाचवेळी अडचणीत सापडले आहेत.

निवडणुकीत अपत्य लपवण्यासाठी ‘पॅटर्न’चा वापर
- मेहराजला बनावट बोनाफाइड प्रमाणपत्र तयार करून देण्यामागे नियोजित कट असून, मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला.
- मनपा निवडणुकीत अपत्य लपवण्यासाठी आणखी कोणत्या उमेदवाराने या पॅटर्नचा वापर केला का? याचाही शोध आवश्यक असल्याचे पोलिसांनी अधोरेखित केले. मेहराजची डीएनए चाचणी देखील केली जाणार आहे.
- इलियास कदीर हा मुख्याध्यापक असलेली शाळा अडचणीत सापडली असून, संपूर्ण रेकॉर्डची खातरजमा केली जाणार आहे.

Web Title: Fake bonafide case reveals big racket; Documents of other suspected candidates also on radar in Mehraj case