घाटनांदूरमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण

By Admin | Updated: May 23, 2014 00:17 IST2014-05-22T23:32:47+5:302014-05-23T00:17:10+5:30

घाटनांदूर: येथे डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ होत असून, तीन ते चार रुग्णांना डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळल्याचे निष्पन्न झाले आहे

Dengue-like illness in Khatanandur | घाटनांदूरमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण

घाटनांदूरमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण

 घाटनांदूर: येथे डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ होत असून, तीन ते चार रुग्णांना डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळल्याचे निष्पन्न झाले आहे. यात आणखी वाढ होण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये वाढ होत असतानाही याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे जागोजागी तुंबलेल्या नाल्या, कचर्‍याचे ढिग, सर्वत्र घाणीचे साम्राज्य यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध घातक आजारांची लागण होत आहे. यातच मागील आठवडाभरात तापेची साथ पसरली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. रक्त नमुने तपासल्यानंतर डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पाणी शुद्धीकरण कारखान्यात काम करणार्‍या रवि हजारे याला प्रथम हा आजार जडला. धनश्री पिंपळे, कावेरी गायकवाड, ऋषीकेश निले हे सुद्धा डेंग्यू सदृश्य आजाराने ग्रासले असल्याचे निष्पन्न झाले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस. सोळंके हे या रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्न करीत असले तरी इतर कर्मचार्‍यांकडून त्यांना साथ मिळत नसल्याने या संख्येत वाढ होत आहे. याबाबत कर्मचारी आपले ऐकत नसल्याची कबुलीही डॉ. सोळंके यांनी ‘लोकमत’ला बोलताना दिली. येथील प्रा. आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी एक वर्षापासून कार्यरत असून, डॉ. शशिकांत साळुंके हे रजेवर आहेत. याबाबत ग्रामविकास अधिकारी बी.डी. जांबळे यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही. (वार्ताहर)

Web Title: Dengue-like illness in Khatanandur