'छ. संभाजीनगर मनपाची नवीन इमारत बांधा, इथे आत्मे बेचैन असतात!' शिरसाटांचे खळबळजनक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:01 IST2026-04-16T12:00:10+5:302026-04-16T12:01:51+5:30
"आग लावणारे खूप, आम्ही विझवणारे आहोत!" संजय शिरसाटांची मनपा राजकारणावर फटकेबाजी; नवीन इमारतीसाठी निधीची ग्वाही.

'छ. संभाजीनगर मनपाची नवीन इमारत बांधा, इथे आत्मे बेचैन असतात!' शिरसाटांचे खळबळजनक विधान
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या १५ कोटी ७८ लाख रुपयांच्या अत्याधुनिक 'जर्मन वॉटर टॉवर' वाहनाचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेच्या जुन्या इमारतीबद्दल बोलताना अत्यंत धक्कादायक विधान केले. "मी या पालिकेत १० वर्षे होतो, ही जागा मुडदे गाडणारी आहे, इथे आत्मे बेचैन असतात. पंचवटी येथे भव्य इमारत बांधा, निधीची चिंता करू नका," असे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले.
विरोधी पक्षनेत्यांना 'हवेत न उडण्याचा' सल्ला
कार्यक्रमादरम्यान शिरसाट यांनी विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांना उद्देशून हिंदीत फटकेबाजी केली. "मी तुमच्या वडिलांसोबत काम केले आहे, त्यामुळे जास्त हवेत उडू नका, हे तुमच्यासाठी चांगले नाही. आता तुमचे उडण्याचे वय आहे, पण योग्य पद्धतीने उडालात तरच योग्य उंचीवर जाल," असा मिश्किल पण रोखठोक सल्ला त्यांनी दिला.
प्रशासकीय दिरंगाईवर ओढले ताशेरे
शहरातील रस्ते रुंदीकरण आणि पोल शिफ्टिंगच्या कामात होत असलेल्या दिरंगाईवरही पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ३२ कोटींचा निधी देऊनही वर्क ऑर्डर का निघाली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच माजी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या कामाचे कौतुक करत, वर्तमान आयुक्त अमोल येडगे यांनाही चांगले काम करण्याचा आणि शहराला न्याय देण्याचा सल्ला दिला.