डिग्री दहावीची, कृत्य हैवानाचे: छ. संभाजीनगरच्या रशीदपुऱ्यात पाच वर्षांपासून गर्भपाताचा कारखाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 20:26 IST2026-04-29T20:25:44+5:302026-04-29T20:26:01+5:30

औषधी, शस्त्रांच्या साठ्यासह थाटले ‘मिनी ऑपरेशन थिएटर’, चौघांना अटक

Degree 10th, act of an animal: Abortion factory in Rashidpura, Chhatrapati Sambhajinagar, for five years | डिग्री दहावीची, कृत्य हैवानाचे: छ. संभाजीनगरच्या रशीदपुऱ्यात पाच वर्षांपासून गर्भपाताचा कारखाना

डिग्री दहावीची, कृत्य हैवानाचे: छ. संभाजीनगरच्या रशीदपुऱ्यात पाच वर्षांपासून गर्भपाताचा कारखाना

छत्रपती संभाजीनगर : पैशांच्या हव्यासापोटी मानवतेची मर्यादा ओलांडत रशीदपुऱ्यात दहावी उत्तीर्ण दाम्पत्याने राहत्या घरातच औषधी, शस्त्रांच्या साठ्यासह ‘मिनी ऑपरेशन थिएटर’ उभारून अवैध गर्भपाताचा क्रूर व्यवसाय सुरू केला होता. वेदनेने विव्हळणाऱ्या महिलांच्या जीवाशी खेळत गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला हा अमानुष धंदा सोमवारी पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला. दोन महिन्यांमध्ये शहरात हे तिसरे गर्भपात रॅकेट उघडकीस आले. गर्भपात करणारे हे दाम्पत्य पाच वर्षांपासून याच परिसरात वारंवार घरे बदलत होते.

सय्यद इर्शाद अहेमद सय्यद गनी (६१), शाहेदा परवीन सय्यद इर्शाद अहमद (५१, दोघे रा. रशीदपुरा), नसरीन नजीर शेख (४७, आझाद चौक), मीनाक्षी मंगेश थोरात (३५, रा. समर्थ रेसिडेन्सी, होनाजीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे असून, मीनाक्षीचा पती मंगेश सुखदेव थोरात हा मात्र पसार झाला. रशीदपुऱ्यात काही महिन्यांपासून गर्भपात सुरू असल्याची माहिती पाेलिस आयुक्त प्रवीण पवार यांना मिळाली होती. पवार यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम यांनी सापळ्याचे नियोजन केले. सोमवारी सायंकाळी कदम, ‘दामिनी’च्या उपनिरीक्षक कांचन मिरधे, अंमलदार निर्मला निंभोरे, सरिता कुंडारे, राणी केदार यांनी थेट शाहेदाच्या घरी छापा टाकला. तेव्हा आत गर्भपातासाठी आलेली २४ वर्षीय विवाहिता वेदनेने विव्हळत होती. पोलिस पोहोचण्याच्या काहीच मिनिटे आधी तिला औषधे देऊन गर्भपाताची प्रक्रिया सुरू केली होती. पोलिसांनी तत्काळ तिला रुग्णवाहिकेद्वारे ‘घाटी’त दाखल केले. त्यानंतर मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पाचारण केले.

तिघांना अटक, मीनाक्षीला लॅबमधून घेतले ताब्यात
- घरात मिळून आलेल्या सय्यद इर्शादने पहिले पोलिसांना विरोध केला. मात्र, पोलिसांनी इंगा दाखवल्यानंतर तो घरात पळतच जात त्याने पत्नीला पोलिस आल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याची पत्नी शाहेदा परवीन, नसरीन नजीर शेख (४७, आझाद चौक) यांना अटक केली.
- त्यांच्या चौकशीत एन- ६ व पळशीत बिटेल डायग्नोस्टिक पॅथलॅबचालक मंगेश सुखदेव थोरात व त्याची पत्नी मीनाक्षी (३५) हे गर्भवतींची तपासणी करून त्यांच्याकडे पाठवत असल्याचे कळवले. त्यानंतर सिटी चौक पोलिसांनी तत्काळ एन- ६ मध्ये जात मीनाक्षीला अटक केली. पीडितेसोबत आलेल्या तिच्या आईलाही पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी केले.

५ मेपर्यंत पोलिस कोठडी
वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी साडेपाचला आरोपी सय्यद इर्शाद, शाहेदा परवीन, नसरीन शेख, मीनाक्षी थोरात यांना न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी अभियोक्ता पल्लवी देशमुख यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीच्या आवश्यकतेची बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. उपाध्याय यांनी आरोपींना ५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सोनोग्राफी रिपोर्ट, १५ हजार पाठवले
सय्यद इर्शाद, शाहेदा परवीनच्या घरात पोलिसांना अनेक महिला रुग्णांचे सोनोग्राफी रिपोर्ट मिळून आले. शिवाय, माेबाइलमध्ये १५ पेक्षा अधिक एजंटचे संपर्क क्रमांक. सोमवारी गर्भपातासाठी पीडितेने शाहेदाला मीनाक्षी व मंगेश थोरातने दिलेला सोनोग्राफी अहवाल पाठवून गर्भपातासाठी ॲडव्हान्स म्हणून १५ हजार रुपये पाठवल्याचे व्हॉट्सॲपद्वारे समोर आले.

घरात थाटले ‘मिनी ऑपरेशन थिएटर’, हे आढळले साहित्य
शाहेदाने चार खोल्यांच्या आलिशान फ्लॅटमध्ये ‘मिनी ऑपरेशन थिएटर’च थाटले होते. मिफेप्रिस्टोन व मिसोप्रोस्टोल गोळ्यांचा साठा आढळला. यातील पहिल्या गोळीमुळे गर्भ टिकत नाही. तर मिसोप्रोस्टोल गोळ्यांच्या सेवनानंतर गर्भाशय आकुंचन होत बाहेर काढला जातो. गर्भाशय पकडण्यासाठीचा चिमटा, रक्तवाहिन्या पकडण्याची साधने, गर्भाशयाची लांबी/दिशा मोजण्याचे साधन, विविध प्रकारच्या सुया, स्टेथोस्कोप, रक्तदाब मोजण्याचे यंत्र, सोनोग्राफी प्रोब, प्रसूतीसाठी वापरले जाणारे इंजेक्शन, वेदना कमी करण्याचे इंजेक्शन, शिरेमध्ये घालायची सुई/कॅथेटर, कापसाचा गठ्ठा, ग्लोव्हज, सरळ रक्तवाहिन्या पकडण्याचे साहित्य, गर्भाशय आकुंचनासाठीच्या इंजेक्शनचा साठाच आढळून आला.

सलीम अली सरोवराजवळून पसार
बिटेल डायग्नोस्टिक पॅथलॅबचालक मंगेश सुखदेव थोरात हा महिलांची तपासणी करून पाठवत होता. सोमवारी शाहेदाच्या घरी छापा पडला तेव्हा तो सलीम अली सरोवराजवळ उभा होता. इकडे छापा पडताच तो पसार झाला. गर्भपातासाठी ‘घाटी’त पाठवलेल्या पीडितेची आई देखील रुग्णालयातून पळून गेली.

Web Title : दसवीं पास, घिनौना काम: छत्रपति संभाजीनगर में गर्भपात रैकेट का भंडाफोड़

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में दसवीं पास एक दंपति पांच साल से अवैध गर्भपात क्लिनिक चला रहा था। पुलिस ने उनके घर पर छापा मारा, एक 'मिनी ऑपरेशन थिएटर' मिला और कई लोगों को गिरफ्तार किया। रैकेट में सोनोग्राफी रिपोर्ट और अग्रिम भुगतान शामिल थे।

Web Title : Tenth-grade degree, heinous act: Abortion racket busted in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : A couple in Chhatrapati Sambhajinagar, with a tenth-grade education, ran an illegal abortion clinic for five years. Police raided their home, finding a 'mini operation theater' and arresting several individuals. The racket involved sonography reports and advance payments.