कचरा संकलनाचा ५२५ वाहनांचा ताफा मनपाच्या कूर्मगतीत अडकला, १ मे रोजी काम सुरू होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 19:56 IST2026-04-23T19:54:14+5:302026-04-23T19:56:06+5:30

ट्रान्सफर स्टेशन, अत्याधुनिक यंत्रणा, महावितरणची डीपी उभारण्यास विलंब

CSNMC Unprepared as Private Company Ready with 525 Vehicles for Waste Collection in Chhatrapati Sambhajinagar | कचरा संकलनाचा ५२५ वाहनांचा ताफा मनपाच्या कूर्मगतीत अडकला, १ मे रोजी काम सुरू होणार का?

कचरा संकलनाचा ५२५ वाहनांचा ताफा मनपाच्या कूर्मगतीत अडकला, १ मे रोजी काम सुरू होणार का?

छत्रपती संभाजीनगर : शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी मनपाने गुजरात येथील एका खासगी कंपनीची नियुक्ती केली. कंपनी दोन महिन्यांपासून ५२५ वाहनांचा ताफा घेऊन कचरा संकलनासाठी सज्ज आहे. मात्र, खुद्द महापालिकेचीच काही तयारी नाही. ट्रान्सफर स्टेशनचे काम अर्धवट, महावितरण कंपनीकडून तीन ठिकाणी डीपी बसविली नाही. कचऱ्याचे वजन करण्यासाठी यंत्रणेचा अभाव, ईव्ही वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा नाही. अशा परिस्थितीत १ मे रोजी कचरा संकलन सुरू करण्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय.

स्वच्छ भारत अभियानात देशातील टॉप १० शहरांमध्ये कचरा संकलनाचा अनुभव असलेल्या कंपनीला मनपाने काम दिले. कंपनीने करोडोंची गुंतवणूक केली. काम सुरू करण्यासाठी कंपनीला ज्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपावर आहे. मात्र, मनपाच्या घनकचरा, यांत्रिकी विभाग, बांधकाम विभाग, विद्युत विभागात अजिबात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. एन-१२, शिवाजीनगर, रामनगर येथे ट्रान्सफर स्टेशन म्हणजेच घंटागाडीतील कचरा मोठ्या कॅप्सूलमध्ये (वाहनात) नेण्याची सोय असलेले केंद्रच उभारलेले नाही. या ठिकाणी किमान महावितरणचे स्वतंत्र ट्रान्सफाॅर्मर लागणार आहे. एकाही ठिकाणी ट्रान्सफाॅर्मर बसवून घेतले नाही. कचरा किती आला, याच्या मोजमापासाठी यंत्रणा उभी केली नाही. पंधरा दिवसांपासून अधिकारी ट्रान्सफर स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचा दावा करतात. मात्र, प्रत्यक्षात आणखी बरेच काम बाकी आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे एमआयडीसी चिकलठाणा, कांचनवाडी येथील ट्रान्सफर स्टेशनचे कामच सुरू नाही. सहाव्या ट्रान्सफर स्टेशनसाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. नाल्यातील गाळ कचरा, रस्त्यावरील माती-दगड हे साहित्य कुठे टाकावे याचेही नियोजन मनपाने केले नाही.

१ मे रोजी काम सुरू
संपूर्ण नियोजन होत आले आहे. वेळेवर कामे होतील. महावितरण एक ते दोन दिवसांत ट्रान्सफार्मर बसवेल. ३ ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन येथे आधुनिक यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत सर्व कामे पूर्ण होतील. १ मे रोजी कोणत्याही परिस्थितीत काम सुरू होणार आहे. काही विभागांत असमन्वय होता, तो बसून दूर करण्यात आलेला आहे. आयुक्त अमोल येडगे लक्ष घालून कामे करून घेत आहेत.
-समीर राजूरकर, महापौर

सज्ज वाहनांचा तपशील
घंटागाड्या-४१२
४०७ वाहने-५०
टिप्पर-१८
जेसीबी-०९
कॅप्सूल वाहने-२४
हूक लोडर वाहने-१२

Web Title : औरंगाबाद में कचरा संग्रहण बेड़ा अटका; 1 मई को शुरुआत अनिश्चित।

Web Summary : औरंगाबाद नगर निगम एक निजी कंपनी के 525 वाहनों के साथ तैयार होने के बावजूद कचरा संग्रहण अनुबंध शुरू करने के लिए संघर्ष कर रहा है। स्थानांतरण स्टेशनों और बिजली कनेक्शन जैसे प्रमुख बुनियादी ढांचे अधूरे हैं, जिससे 1 मई की शुरुआत की तारीख पर संदेह है।

Web Title : Aurangabad's waste collection fleet stalled; May 1st start uncertain.

Web Summary : Aurangabad's municipal corporation is struggling to initiate a waste collection contract despite a private company's readiness with 525 vehicles. Key infrastructure like transfer stations and electricity connections are incomplete, casting doubt on the May 1st start date.