छत्रपती संभाजीनगरमध्ये 'पंचतारांकित' धमाका! शहरात येणार ६ नवीन फाईव्ह स्टार हॉटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 12:08 IST2026-04-20T12:07:31+5:302026-04-20T12:08:41+5:30
ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी शहरात येऊ घातलेल्या विविध हॉटेल्सच्या ग्रुपसोबत चर्चा सुरू असल्याचे नुकतेच ‘लोकमत’च्या कार्यक्रमात सांगितले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'पंचतारांकित' धमाका! शहरात येणार ६ नवीन फाईव्ह स्टार हॉटेल्स
छत्रपती संभाजीनगर : आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ८०च्या दशकात छत्रपती संभाजीनगरने ओळख निर्माण केली होती. आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीने शहराचा औद्योगिक आणि नागरी विकास होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात आणखी सहा पंचतारांकित हॉटेल्सची भर पडणार आहे.
यासंदर्भात ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी शहरात येऊ घातलेल्या विविध हॉटेल्सच्या ग्रुपसोबत चर्चा सुरू असल्याचे नुकतेच ‘लोकमत’च्या कार्यक्रमात सांगितले. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक झोनमध्ये मागील अडीच वर्षांत सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणारे प्रकल्प आले आहेत. त्यात प्रामुख्याने जपानच्या टोयोटा-किर्लोस्कर मोटार्स, जेएसडब्ल्यू आणि एथर एनर्जीसारख्या ईव्ही कंपन्यापोठोपाठ त्यांच्या पुरवठादार कंपन्यांनी येथे प्रकल्प उभारण्यासाठी भूखंड घेतले आहेत. यासोबत आणखी अडीच हजार एकर जमिनीची मागणी विविध उद्योग समूहांकडून आली आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने आणखी ८ हजार एकर जमीन बिडकीन डीएमआयसीमध्ये संपादित करण्याचा निर्णय घेतला. शहरात पाच स्कील डेव्हलपमेंट सेंटर साकारले जात आहेत. यापैकी एमआयडीसीचे स्कील डेव्हलपमेंट सेंटर शेंद्रा एमआयडीसीमध्ये कार्यान्वित झाले आहे. शहरातील रोजगारांच्या संधी कितीतरी पटीने वाढणार आहे. सन २०४७ पर्यंत शहराची लोकसंख्या ५० लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात आणखी सहा पंचतारांकित हॉटेल्स येऊ घातल्या असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. शहरात केवळ दोन पंचतारांकित हॉटेल्स आहेत. शहरात होणाऱ्या विविध कॉन्फ्रन्स आणि इंडस्ट्रीयल एक्स्पोसारख्या उपक्रमाच्या वेळी येथील हॉटेल्सच्या रूम अपुऱ्या पडतात. भविष्याची गरज ओळखून मोठ्या हॉटेल्स शहरात येण्याची तयारी करीत आहेत. हॉटेल व्यावसायिक ग्रुपकडून हॉटेल्ससाठी जागांची पहाणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्याचे ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनीही ‘लोकमत’च्या एका कार्यक्रमात यावर भाष्य करत दुजोरा दिला आहे.
२०४७ पर्यंत शहराची लोकसंख्या ५० लाखांवर
शहराचा चोहोबाजूंनी विकास होत आहे. डीएमआयसीमध्ये येऊ घातलेल्या विविध प्रकल्पामुळे शहरातील रोजगारांच्या संधी वाढणार आहेत. २०४७ पर्यंत शहराची लोकसंख्या ५० लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मोठ्या कंपन्यांच्या आगमनासोबत येथे हॉटेल्स व्यवसायाला मोठी संधी दिसत असल्याने विविध ग्रुपकडून येथे पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी पाहणी सुरू केली आहे.