"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 18:59 IST2026-04-20T18:54:56+5:302026-04-20T18:59:09+5:30
Anjali Damania Devendra Fadnavis Women Reservation: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुद्द्यांवर बोट ठेवत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी टीका केली आहे.

"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Anjali Damania Latest News: "फडणवीसांचा खरेपणा संपत चालला आहे. पूर्वी ते तसे नव्हते, पण आता ते फक्त राजकारण करतात", अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी टीका करणारी पोस्ट केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेवर टीका करत अंजली दमानिया म्हणाल्या की, "महिला आरक्षण विधेयकाचा आणि डिलिमिटेशन (मतदारसंघ फेररचना) काहीच संबंध नाही; हे पूर्ण माहीत असताना फक्त खोटं बोलण्याचा भाजपाचा अजेंडा अगदी रेटून नेण्याचे काम फडणवीस करत आहेत."
"फडणवीसांनी १३ महिलांना मंत्री करावे"
एक्सवर केलेल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये दमानिया म्हणाल्या की, "विरोधी पक्ष बँड वाजवून डान्स करावा', हे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्या भाजपाने महाराष्ट्रात १४९ उमेदवारांमध्ये फक्त १५ महिला उमेदवार निवडणुकीत उभे केले, ते असे डायलॉग मारतात? वाह!"
"महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री आहेत. आता एक काम करा, मंत्रिमंडळ विस्तार करून ३३ टक्के (१३) महिला मंत्री आणा. पूर्ण महाराष्ट्र बँड वाजवून डान्स करेल", असा उपरोधिक सल्ला दमानियांनी फडणवीसांना दिला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, "गृहमंत्र्यांनी म्हणाले आम्ही बदल करतो, तुम्ही पाठिंबा द्या. विरोधकांची बोलती बंद झाली. भाजपावर आरोप केले. राजस्थान, गुजरात, दिल्ली अशा ठिकाणी भाजपाने महिला मुख्यमंत्री दिले. या लोकांनी कधीही याठिकाणी महिलांना मुख्यमंत्री बनू दिले नाहीत. माझ्या स्तरावरील कोणत्याही नेत्याने माझ्याशी खुली चर्चा करावी. माझे आव्हान आहे. मात्र, ते करणार नाहीत. ते पळून जातात", असे खुले आव्हान मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना दिले.
सुप्रिया सुळेंनी आव्हान स्वीकारले
"मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाचा काय संबध आहे? ५४३ सदस्यांमध्ये महिलांना आरक्षण द्या. आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही. अनेक देशात सध्या अराजकता माजली आहे, त्यात तुम्ही विधेयक आणले. महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीच आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत या विषयावर चर्चा करायला मी तयार आहे. त्यांनी जागा आणि वेळ सांगावी", असे सुप्रिया सुळे टीकेला उत्तर देताना म्हणाल्या.