ज्येष्ठ नागरिकांना हवे शहरात विविध उपक्रमांसाठी भवन
By Admin | Updated: August 13, 2014 01:44 IST2014-08-13T01:21:35+5:302014-08-13T01:44:57+5:30
शहरात ज्येष्ठ नागरिक भवन हवे, असा विचार सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ कोपरकर आणि कार्यकारिणी सदस्य वैशाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नागरिकांना हवे शहरात विविध उपक्रमांसाठी भवन
नजीर शेख, औरंगाबाद
आपल्या शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या आठ ते दहा संघटना आहेत. त्यांची सभासदसंख्या चार हजारांच्या आसपास आहे. ज्येष्ठांचे अनेक उपक्रम या शहरात होत आहेत, त्यासाठी आता या शहरात ज्येष्ठ नागरिक भवन हवे, असा विचार सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ कोपरकर आणि कार्यकारिणी सदस्य वैशाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली असता या चर्चेमधून ज्येष्ठ नागरिक भवनाचा मुद्दा पुढे आला. महापालिकेने आमच्या संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या विविध उपक्रमांसाठी हॉल देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्याचा पाठपुरावा होऊनदेखील मागणी पूर्ण झाली नाही. वास्तविक पाहता राज्य शासनाचे धोरण आहे की, प्रत्येक वॉर्डात ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी एक केंद्र असावे; मात्र हे धोरण महापालिकेतर्फे राबविले जात नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेच्या कार्यालयासाठी किंवा उपक्रमासाठी महापालिकेच्या शाळांमधील एक खोलीदेखील उपलब्ध होऊ शकते; मात्र तसे आपल्याकडे होताना दिसत नाही. सध्या शहरात महापालिकेचे अनेक हॉल व्यावसायिक पद्धतीने भाड्याने दिले जात आहेत. असा निर्णयच स्थायी समितीने घेतला आहे. आम्हाला असे भाडे परवडत नाही, त्यामुळे आम्हाला मंदिरात बैठका घ्याव्या लागतात. शहराच्या वेगवेगळ्या भागांत ज्येष्ठ नागरिक संघटना कार्यरत आहेत, त्यामुळे त्या त्या ठिकाणी संघटनेसाठी हॉलची सोय झाली तर उत्तम. सध्या ज्येष्ठ नागरिकांना गणपती बसविण्यासाठीही जागा नाही, अशी स्थिती आहे. कुणाच्या तरी घरी गणपती बसविला जातो. सिडकोमध्ये वि. वि. चिपळूणकर यांच्या पुढाकारामुळे त्यांच्या संस्थेसाठी स्वत:ची जागा निर्माण झाली आहे; मात्र इतर संस्थांना त्यांची जागा नाही.
शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संस्था एकाच प्लॅटफॉर्मवर येण्याचा सध्या विचार चालू आहे. सर्वांच्या हिताच्या मुद्यावर एकत्रित उपक्रम, कार्यक्रम घेता यावेत, असा विचार पुढे आला आहे. यासाठी शहरात भव्य असे ज्येष्ठ नागरिक भवन असायला हवे. यामध्ये विविध उपयोगी हॉल, कार्यालयासाठी जागा, ग्रंथालय, आरामखोली, जीम, चालण्यासाठी जागा, आरोग्य तपासणी केंद्र, करमणुकीसाठी काही खेळ किंवा साधने तेथे देता येतील.
खरे तर राज्य शासनाने धोरण म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवन बांधायला हवे. तिथे ‘डे केअर सेंटर’ निर्माण करता येईल. मोठ्या शहरात एकापेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक भवन असावेत. पुढे चालून तालुक्याच्या ठिकाणीही ते करता येईल. खरे तर राज्य शासनाने जागा दिली तरी ती आताच्या परिस्थितीत शहराबाहेर मिळेल, त्यामुळे ते ज्येष्ठांच्या सोयीचे नसेल. त्यापेक्षा महापालिकेनेच वेगवेगळ्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी हॉल उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल. एकत्रित कार्यक्रमासाठी मोठे भवन उपयोगी पडेल. पुण्यामध्ये अनेक संघटनांना त्या त्या भागात हॉल मिळाले, त्यामुळे त्या संघटनांना स्थैर्य प्राप्त झाले. त्यांचे सामाजिक उपक्रमही वाढले. असाच प्रयोग औरंगाबाद शहरात व्हायला हवा.