टेस्टिंगनंतर छत्रपती संभाजीनगरात १ मे रोजी पाणी येईल असे वाटले होते...पण तसे घडले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 17:32 IST2026-05-02T17:31:42+5:302026-05-02T17:32:21+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) काही अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनी यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून बेबनाव सुरू आहे.

After testing, it was expected that water would arrive in Chhatrapati Sambhajinagar on May 1st...but that did not happen. | टेस्टिंगनंतर छत्रपती संभाजीनगरात १ मे रोजी पाणी येईल असे वाटले होते...पण तसे घडले नाही

टेस्टिंगनंतर छत्रपती संभाजीनगरात १ मे रोजी पाणी येईल असे वाटले होते...पण तसे घडले नाही

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १४ एप्रिल रोजी जायकवाडीचे पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले. जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मागील पंधरा दिवस किरकोळ कामे करण्यात घालविल्यामुळे शहरात पाणी येऊ शकले नाही. नक्षत्रवाडी ते जायकवाडी या उलट दिशेने जलवाहिनीची स्वच्छतासुद्धा झालेली नाही. गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तीन तास बैठक घेण्यात आली. बैठकीत रखडलेल्या निधीवरच चर्चा करण्यात आली.

शहराला १ मे रोजी पाणी द्यावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, शुक्रवारी (दि.१ मे) शहरात पाणी आले नाही. ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या.

मजीप्रा आणि जीव्हीपीआरदरम्यान चाललंय काय?
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) काही अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनी यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून बेबनाव सुरू आहे. त्याचा फटका शहरातील १८ लाख नागरिकांना बसतो आहे. १४ एप्रिल रोजी जलवाहिनीची यशस्वीरीत्या टेस्टिंग घेतली. त्यानंतर पाणी उलट दिशेने म्हणजे नक्षत्रवाडी ते जायकवाडीकडे प्रेशरने नेऊन जलवाहिनी पूर्ण स्वच्छ करणे अपेक्षित होते. मागील पंधरा दिवसांत हे काम झालेच नाही. स्कोअर व्हॉल्व्हचे नटबोल्ट टाइट करणे, नवीन बसविणे, एअर व्हॉल्व्ह बसविणे आदी कामे करण्यात येत होती. पुढील दोन ते तीन दिवसांत जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाणी आले असते तर...
नवीन जलवाहिनीद्वारे किमान ६० ते ७० एमएलडी अतिरिक्त पाणी नक्षत्रवाडीत आणले तर ते शुद्ध करून शहराला वापरता येऊ शकते. नागरिकांना किमान तीन ते चार दिवसाआड पाणी मिळू शकले असते. ४२-४३ अंश तापमानामुळे शहरात पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. नागरिक पाण्यासाठी तहानलेले आहेत. मात्र, याचे गांभीर्य मजीप्राला नाही.

बिले थांबवली, मंजुरीच नाही...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री. रंगनायक गुरुवारी शहरात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पाणीपुरवठ्याची आढावा बैठक घेतली. बैठकीत जीव्हीपीआर कंपनीने केलेल्या कामांना मजीप्रा अधिकाऱ्यांनी मंजुरीच दिलेली नाही. मागील काही महिन्यांपासून ८२ कोटी रुपयांची बिले थांबवून ठेवली आहेत. कोणती कामे केली त्यावर मुद्देनिहाय चर्चा करण्यात आली. बैठकीस पोलिस आयुक्त प्रणीव पवार, पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्यासह मनपा, मजीप्रा अधिकारी उपस्थित होते.

Web Title : परीक्षण सफल होने के बाद भी छत्रपति संभाजीनगर में पानी की आपूर्ति में देरी

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में 1 मई को अपेक्षित पानी की आपूर्ति, प्राधिकरण और जीवीपीआर के बीच विवादों, पाइपलाइन की सफाई पूरी न होने और लंबित बिलों के कारण विलंबित है। नागरिक पानी की भारी कमी का सामना कर रहे हैं।

Web Title : Water supply delayed in Chhatrapati Sambhajinagar despite testing success.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's water supply, expected May 1st, delayed due to disputes, incomplete pipeline cleaning, and pending bill approvals between authorities and GVPR. Citizens face acute water scarcity.