साडी नेसून लूटमार करणाऱ्या टोळीनेच घेतला वकिलाचा जीव; मुख्य मारेकऱ्याची कबुली, टोळी पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:46 IST2026-04-18T13:45:07+5:302026-04-18T13:46:26+5:30
३०० रुपयांवरून वकिलाचा बळी; आरोपींनी मोबाईल आणि वॉलेट केले लंपास, बीड बायपासवरील टोळ्यांचे धाबे दणाणले.

साडी नेसून लूटमार करणाऱ्या टोळीनेच घेतला वकिलाचा जीव; मुख्य मारेकऱ्याची कबुली, टोळी पसार
छत्रपती संभाजीनगर : लूटमारीच्या प्रयत्नातूनच ॲड. मिथुन पुंडलिक भास्कर (४९, रा. आनंदनगर) यांची साडी व अन्य विचित्र वेशभूषा करणाऱ्या टोळीने क्रूर हत्या केली. बीड बायपासवरील गांधेली शिवारात बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यात अटक झालेल्या सादिक बशीर अन्सारी (४०, रा. शहानूरमिया दर्गा, उस्मानपुरा), नानासिंग हिरासिंग जुनी (२०, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकील म्हणून कार्यरत असलेले भास्कर बुधवारी सायंकाळी गांधेली शिवारात कामानिमित्त गेले होते. सादिकने त्यांना रस्त्यात गाठून साधारण ५० मीटर आत नेत पैशांची मागणी केली. मिथुन यांनी ३०० रुपयांची तयारी दाखविली. मात्र, त्याने आणखी रोख मागत लुटण्याचा प्रयत्न केला. टाळ्यांचा इशारा देत सादिकने अन्य टोळीला बोलावून घेतले. सर्वांनी मिळून मिथुन यांना मारहाण करत त्यांचे पाकीट, मोबाइल हिसकावून मांडीत चाकू खुपसून हत्या केली.
टोळीचा शोध सुरू, मोबाइल, वॉलेटचा शोध सुरू
पोलिस निरीक्षक साेमनाथ जाधव यांनी शुक्रवारी सादिक, नानासिंगला दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपींनी हत्येनंतर मिथुन यांचे वॉलेट, मोबाइल लंपास केला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. शिवाय, बीड बायपासवर मोठ्या प्रमाणात अशा टोळ्या दररोज उभ्या राहत होत्या. त्यांचाही कसून शोध पोलिस घेत आहेत.
सादिकच्या जबाबात घटनाक्रम स्पष्ट
सादिक स्वत: व अन्य टोळी महिलांसारखी वेशभूषा करून तो बीड बायपासवर लूटमार कशी करायचा, हे त्याच्या जबाबात स्पष्टपणे समोर आले आहे. तो स्वत:ला तृतीयपंथी सांगत होता. त्याची लवकरच वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होईल.
-सोमनाथ जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे
तो तृतीयपंथी नाहीच
झालेली हत्या दुर्दैवी आहे. घटनेतील मारेकरी तृतीयपंथीचा वेश धारण करत होता; पण तो तृतीयपंथी नाही. तृतीयपंथी समाज असे कृत्य कदापि करणार नाही. घटनेत तृतीयपंथीयांचा संबंध असेल तर पोलिस प्रशासनाने तो स्पष्टपणे जाहीर करावा. आम्ही पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी स्पष्ट भूमिका सर्व तृतीयपंथी समाजाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.