आरोपींनी सांगितली खोटी नावे

By Admin | Updated: August 13, 2014 01:42 IST2014-08-13T01:27:25+5:302014-08-13T01:42:47+5:30

औरंगाबाद : अटकेनंतर या आरोपींना जेव्हा विचारपूस करण्यात आली तेव्हा त्यांनी खोटी नावे सांगितली होती.

The accused named false names | आरोपींनी सांगितली खोटी नावे

आरोपींनी सांगितली खोटी नावे

औरंगाबाद : अटकेनंतर या आरोपींना जेव्हा विचारपूस करण्यात आली तेव्हा त्यांनी खोटी नावे सांगितली होती.
या कारवाईबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त अविनाश आघाव यांनी सांगितले की, एपीआय कॉर्नरवरील हॉटेल लोकसेवासमोर (एमएच-४८- एफ- १२५९) जीपची काच फोडून चार लाख रुपये चोरी गेले असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांना सोमवारी रात्री मिळाली. माहिती मिळताच येथील फौजदार अनिल वाघ हे ‘लोकसेवा’वर पोहोचले. तेथे जीपवाले पाच जण पोलिसांना भेटले. पैसे चोरी गेल्याचे सांगणारे हे पाचही जण संशयित वाटल्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी या पाचही जणांकडे विचारपूस सुरू केली, तेव्हा पैसे चोरीचा बनाव केलेला असल्याची पोलिसांना खात्री पटली. पोलिसांनी सर्वांना नाव विचारले, तेव्हा आरोपी सुरेश उमपने आपले नाव सुरेश देशमुख असे सांगितले. विजय शिंदे याने आपले नाव विनायक शिंदे सांगितले, तर श्रीकांत उमपने आपले नाव श्रीकांत सुरेश देशमुख असे सांगितले होते.
पोलिसांनी पाचही आरोपींना वेगवेगळी विचारपूस केली, तेव्हा सुरेश देशमुख नाव सांगणारा व्यक्ती पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार सुरेश उमप असल्याचे उघडकीस आले. हे पाचही आरोपी औरंगाबादेत बँक लुटण्यासाठीच आले होते, असे स्पष्ट होताच पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
अनेक जिल्ह्यांत दरोड्याचे गुन्हे
पकडलेला आरोपी सुरेश उमप असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी या टोळीचे राज्यभरातील रेकॉर्ड धुंडाळले, तेव्हा सुरेश व त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बँका फोडून तिजोरी पळविण्याचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती, इंदापूर, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीगोंदा, कर्जत, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, लांजा, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा, खुलताबाद पोलीस ठाण्यात असे गुन्हे दाखल आहेत.
सुरेश उमपविरुद्ध सागर देशमुख या नावाने राज्यात १८ दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आल्याचे सहायक आयुक्त आघाव यांनी सांगितले.
गॅस कटरने तिजोरी फोडण्यात एक्स्पर्ट
आरोपी सुरेश उमप हा गॅस कटरने कोणत्याही बँकेचे शटर आणि तिजोरी फोडण्यात एक्स्पर्ट आहे. अवघ्या काही मिनिटांच्या आत तो कोणत्याही बँकेची कसलीही तिजोरी फोडतो, असे आघाव म्हणाले.
उमप हा आपल्या कारच्या डिक्कीत सतत गॅस कटर घेऊन फिरत असतो. संधी मिळताच तो सहकाऱ्यांच्या मदतीने बँक फोडायचा. विशेष म्हणजे सुरेश उमप हा एक्स्पर्ट असल्याने कोणताही दरोडा टाकला की त्यातील निम्मा हिस्सा त्याचा असायचा.

Web Title: The accused named false names