निवृत्तीचे ८ लाख हडपले, परत मागताच बसचालकाचे तुकडे केले; लिपिकास जन्मठेप, ५ लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:46 IST2026-04-18T14:44:40+5:302026-04-18T14:46:40+5:30
कुऱ्हाडीने गळा चिरून केले होते तुकडे! मुजीब अहमद खान यांच्या हत्येचा थरार; लिपिक काझी अतिकउद्दीनला कठोर शिक्षा.

निवृत्तीचे ८ लाख हडपले, परत मागताच बसचालकाचे तुकडे केले; लिपिकास जन्मठेप, ५ लाखांचा दंड
छत्रपती संभाजीनगर : सेवानिवृत्त बसचालक मुजीब अहमद खान आबेद रशीद खान (५९, रा. शहानगर, बीड बायपास) यांचे ८ लाख रुपये हडपल्याचे बिंग फुटल्यामुळे मुजीब यांचा खून करणारा लिपिक काझी अतिकउद्दीन अमीरउद्दीन (३६, रा. एसटी कॉलनी, कटकट गेट) याला सत्र न्यायाधीश निखिल मेहता यांनी गुरुवारी (दि. १६) जन्मठेप व ५ लाख १५ हजार रुपये दंड ठोठावला. सबळ पुराव्याअभावी दुसऱ्या आरोपीला निर्दोष मुक्त केले.
मुजीब अहमद एसटी महामंडळातून जानेवारी २०२० ला सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेसाठी त्यांनी विभागीय नियंत्रक कार्यालयात अर्ज केला. अर्जाच्या चौकशीसाठी ९ जुलै २०२०ला ते कार्यालयात गेले असता बेपत्ता झाले. त्यांचा मुलगा रशीद खान याने तक्रार दिली होती.
भविष्य निर्वाह निधी व पेन्शनशी संबंधित कामकाज पाहणारा कार्यालयातील लिपिक काझी याच्यावर नातेवाइकांनी संशय व्यक्त केला. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता काझीने २०१७ मध्ये मुजीब खान यांच्या खात्यातील ८ लाख रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी ४ लाख परत केले. बाकी रक्कम देण्याचे तो टाळत होता.
मुजीब यांनी वारंवार पैशांची मागणी करून तक्रार करण्याची धमकी दिल्याने काझीने त्यांचा काटा काढण्याचा कट रचला. कागदपत्रांच्या पूर्ततेच्या बहाण्याने त्यांना ९ जुलैला कार्यालयात बोलावले. मित्राकडून पैसे देतो असे सांगून कारमधून त्यांना सहकारी अफरोज खानच्या घरी नेले. तेथे बोलण्यात गुंतवून मागून कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला. चाकू व कुऱ्हाडीने गळा चिरून शिर आणि धड वेगळे केले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून त्यावर सिमेंट टाकले. धड विहिरीत फेकून डोके पडक्या खोलीत लपवले होते.
सुनावणी व शिक्षा
क्रांती चौकचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी तपास करून दोषारोपपत्र सादर केले. सहायक लोकअभियोक्ता अनिल हिवराळे यांनी जबाब नोंदवले. त्यांना ॲड. शेख एच. एम. यांनी साहाय्य केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार रहीम शेख व गुलाब भोसले यांनी काम पाहिले.