लोखंडी सब्बलने पत्नीची निर्घृण हत्या मीच मारलं... म्हणत पती धावला थेट पोलीस ठाण्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:52 IST2026-05-15T11:51:57+5:302026-05-15T11:52:36+5:30
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी प्रकाश सोळंके याने लोखंडी सब्बलने पत्नीच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती पूजा रमेश सोळंके हिने फिर्यादी संजय शेनाजी मेढे ( ४३) यांना दिली.

लोखंडी सब्बलने पत्नीची निर्घृण हत्या मीच मारलं... म्हणत पती धावला थेट पोलीस ठाण्याकडे
खामगाव: शहरातील रेल्वे गेट परिसरातील झोपडपट्टी भागात एका विवाहितेचा निर्घृण खून झाल्याची थरारक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सौ. सविता प्रकाश सोळंके ( २२) यांचा पती प्रकाश रुपलाल सोळंके (२५, रा. रेल्वे गेट परिसर, खामगाव) यांच्यासोबत वारंवार कौटुंबिक वाद होत होता. गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले.
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी प्रकाश सोळंके याने लोखंडी सब्बलने पत्नीच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती पूजा रमेश सोळंके हिने फिर्यादी संजय शेनाजी मेढे ( ४३) यांना दिली. त्यानंतर फिर्यादी आरोपीच्या घरी पोहोचले असता सविता सोळंके ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली.
तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी आरोपी प्रकाश हा हातात लोखंडी सब्बल घेऊन घटनास्थळी उभा होता. आपण सविताला मारले असून आता पोलीस स्टेशनला जात आहे,असे सांगून आरोपी तेथून निघून गेल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विकास पाटील करीत आहेत.